Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कमी होणारी कोरोना रुग्णसंख्या दिलासादायक

नाशिक, दि29 : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळविण्यासाठी जिल्ह्यात लागू करण्यात आलेला कडक निर्बंधांमुळे कोरोनाबाधितांची कमी होणारी रुग्णसंख्या ही दिलासादायक बाब आहे. तरीही तिसऱ्या लाटेची तयारी आणि कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस हा आजार तसेच लहान मुलांना असणाऱ्या धोक्याच्या अनुषंगाने असणाऱ्या उपचारांच्या नवीन आव्हानांसाठी जिल्हा प्रशासन व आरोग्य यंत्रणा सज्ज असल्याचे प्रतिपादन राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

आज जिल्हाधिकारी कार्यालयातील मध्यवर्ती सभागृहात जिल्ह्यातील कोरोना व कोरोनापश्चात आजारांबाबत घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत पालकमंत्री श्री. भुजबळ बोलत होते. या बैठकीस जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, अन्न, औषध प्रशासनाचे सह आयुक्त दुष्यंत भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे, उपजिल्हाधिकारी वासंती माळी, निलेश श्रींगी, गणेश मिसाळ, औद्योगिक विकास महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक नितीन गवळी, जिल्हा सामान्य रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, डॉ. उत्कर्ष दुधडीया, डॉ. संजय गांगुर्डे, बालरोग तज्ज्ञ डॉ. पंकज गाजरे आदी उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, कोरोनानंतर होणाऱ्या म्युकरमायकोसिस या आजाराच्या अनुषंगाने जिल्हा सामान्य रुग्णालयात आवश्यक डॉक्टर्स, बेड्स व औषधे उपलब्ध करून घेण्यात येत आहेत. या आजारासाठी लवकरात लवकर शस्त्रक्रिया विभाग कार्यान्वित करण्यात येणार आहे.  तसेच या आजाराचा समावेश महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात आला असल्याने या बाधित रुग्णांना याचा लाभ होणार आहे. याचप्रमाणे लहान मुलांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेता त्यांच्यासाठी आवश्यक असणारा औषधांचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध करून घेण्यात येत आहे. सध्याच्या काळात सुरू असलेली कोविड केअर सेंटर्स बंद न करता त्यांची योग्य निगा राखून, त्यांना नियमित सॅनिटाईज करण्यात यावे, असेही पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले.

आदिवासी भागातील नागरिकांमध्ये कोरोना उपचार व लसीकरणाच्या अनुषंगाने तेथील स्थानिक नागरिक, लोक कलावंत, शिक्षक अशा व्यक्तींच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. त्याचप्रमाणे यासाठी आयुर्वेदिक डॉक्टरांचेदेखील सहकार्य घेण्यात यावे. जेणेकरून आदिवासी भागातील नागरिकांच्या मनातील लसीकरणाविषयीचे गैरसमज दूर होण्यासाठी मदत होईल, असेही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले.

कडक निर्बंध काही प्रमाणात शिथिल करताना जीवनावश्यक वस्तूंच्या व्यतिरिक्त इतर व्यावसायिकांना देखील वेळेचे व कोरोनाविषयक नियमांचे कोटेकोरपणे पालन करून ठराविक वेळेसाठी दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याबाबत राज्य शासनाच्या सूचना आल्यानंतर त्याप्रमाणे जिल्हास्तरावर योग्य ते निर्णय घेतले जातील असे श्री. भुजबळ यांनी सांगितले. तसेच बाजार समित्यांमध्ये सध्या कार्यरत असलेली कोरोनाविषयक नियमावली व चाचण्या करणे सुरूच ठेवावे, याबाबत पोलिस यंत्रणांनी देखील लक्ष द्यावे, अशा सूचनादेखील पालकमंत्री श्री. भुजबळ यांनी यावेळी दिल्या आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेतील लहान मुलांना असणारा संभाव्य धोका लक्षात घेऊन त्यांच्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयांना नाशिक व मालेगाव महानगरपालिकेने परवानगी द्यावी. तसेच म्युकरमाकोसिसच्या उपचार व शस्त्रक्रियेसाठी सहा खाजगी नाक, कान व घसा तज्ज्ञ अशा डॉक्टरांनी आपली सेवा जिल्हा सामान्य रुग्णालयात उपलब्ध करून दिल्याबद्दल पालकमंत्री यांनी त्यांचे आभार मानले आहेत.

या बैठकीत म्युकरमायकोसिस आजाराच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनाची माहिती देताना जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सांगितले की, म्युकरमायकोसिस आजारावर नियंत्रण आणण्यासाठी व या आजाराचे औषोधोपचार वेळेत उपलब्ध होण्यासाठी कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. म्युकरमायकोसिस या आजाराच्या उपचारासाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेत जिल्ह्यातील 6 रुग्णालयांचा समावेश करण्यात आला असून त्यांना ह्या योजनेचा लाभ मिळेल या दृष्टीने प्रयत्नपूर्वक नियोजन करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यात ऑक्सिजनचा पुरेसा साठा उपलब्ध असून ऑक्सिजनच्या कायमस्वरूपी सुविधेसाठी जिल्ह्यात 55 नवीन ऑक्सिजन प्रकल्प तयार करण्यात येत आहेत. तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्हा पातळीवर सर्व यंत्रणांच्या समन्वयाने नियोजन करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांनी पालकमंत्री श्री. भुजबळ यांना दिली.

यासोबत महानगरपालिका आयुक्त व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपल्या कार्यक्षेत्रात केलेल्या कामांची व नियोजनाची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.

 

जिल्हाधिकारी यांच्या आवाहनाला खाजगी डॉक्टर्सचा प्रतिसाद :

जिल्ह्यातील म्युकरमायकोसिस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढ लक्षात घेता, जिल्हा सामान्य रुग्णालय येथे मनुष्यबळ व आधुनिक साधन सामुग्री उपलब्ध होईपर्यंत रुग्णांच्या शस्त्रक्रिया करण्यासाठी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी सामाजिक बांधिलकी म्हणून खाजगी कान, नाक व घसा तज्ञ डॉक्टर्स यांना सेवा देण्याचे आवाहन केले होते.

जिल्हाधिकारी श्री. मांढरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत म्युकरमायकोसिस रुग्णांच्या शस्त्रक्रीया करण्यासाठी खालील सहा डॉक्टर्सने सहमती दर्शविली आहे.  डॉ. नितीन देवरे, कान,नाक व घसा तज्ञ भ्रमणध्वनी क्रमांक ९७६२७२५९५७ हे सोमवारी, डॉ.राजेन्द्र पगारे कान, नाक व घसा तज्ञ भ्रमणध्वनी क्रमांक ९८२२०४५९१५ हे मंगळवारी, डॉ.मुकेश मोरे, कान,नाक व घसा तज्ञ भ्रमणध्वनी क्रमांक ९२२४५०७९१५ हे बुधवार व गुरुवार, डॉ.सौमीन गडकरी Oral Maxillo Facial Surgeon भ्रमणध्वनी क्रमांक ७९७२५७४६०७ हे मंगहवार व शुक्रवार, डॉ.गुंजन मनचंदा कान,नाक व घसा तज्ञ भ्रमणध्वनी क्रमांक ९७६६९२०८९६ हे शनिवार आणि डॉ. गिरीष नेहते Occuloplastic Surgeon भ्रमणध्वनी क्रमांक ७७३८०९२६०४ हे गुरुवार या दिवशी उपरोक्त सर्व डॉक्टर्स आपली सेवा नाशिक जिल्हा रुग्णालय येथे देणार आहेत.

Exit mobile version