भारतातील उपचाराधीन कोविड बाधितांची संख्या 3 लाखांच्या खाली घसरली, गेल्या 163 दिवसांमधील सर्वात कमी संख्या
जागतिक महामारी विरोधात आज भारताने महत्त्वपूर्ण कामगिरीची नोंद केली.
भारतातील उपचाराधीन कोविड बाधितांची संख्या 3 लाखांच्या (2,92,518) खाली घसरली. उपचाराधीन कोविड बाधितांची संख्या एकूण बाधित रुग्णांच्या 3 टक्क्यांच्या खाली घसरून 2.90 टक्क्यांवर आली आहे. गेल्या 163 दिवसांमधील हे सर्वात कमी प्रमाण आहे. 12 जुलै 2020 रोजी 2,92,258 सक्रीय कोविड रुग्णांची नोंद होती.
गेल्या 24 तासांत एकूण सक्रिय रुग्णांच्या संख्येत 11,121 इतकी घट झाली.
दैनंदिन रुग्णसंख्येत भारताने नवीन नीचांकी पातळी गाठली आहे. 173 दिवसानंतर गेल्या 24 तासांत 20,000 पेक्षा कमी (19,556) नवीन रुग्ण आढळले. 2 जुलै, 2020 रोजी नवीन रुग्णांची संख्या 19,148 होती.
प्रति दहा लाख लोकसंख्येमागे सक्रिय रुग्ण आढळण्याचे भारताचे प्रमाण जगात सर्वात कमी प्रमाण असलेल्या देशांपैकी (219) एक आहे. अमेरिका, इटली, ब्राझील, तुर्की आणि रशियासारख्या देशांमध्ये हे प्रमाण बरेच जास्त आहे.
कोविड संसर्गातून पूर्ण बरे झालेल्यांची एकूण संख्या आता 96 लाखांच्या पुढे गेल्यामुळे (96,36,487) रुग्ण बरे होण्याचा दर 95.65 टक्के झाला आहे. रोगमुक्त झालेले आणि उपचार सुरु असलेले रुग्ण यांच्या संख्येतील तफावत दिवसेंदिवस वाढत असून सध्या ही तफावत 93,43,969. इतकी आहे.
गेल्या 24 तासांत 30,376 रुग्ण बरे झाले. गेल्या 25 दिवसांपासून बरे झालेल्या रुग्णांची संख्या नवीन रुग्णांपेक्षा जास्त आहे.
दररोजच्या वाढत्या चाचण्या, मोठ्या प्रमाणात बरे होणारे रुग्ण आणि सातत्याने घटत असलेल्या नवीन रुग्णसंख्येमुळे मृत्यूदरात घट झाली आहे.
नव्याने रोगमुक्त झालेल्या कोविड बाधितांपैकी 75.31 % रुग्ण देशातील 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील आहेत.
महाराष्ट्रात काल एका दिवसांत रोगमुक्त झालेल्यांची संख्या सर्वाधिक म्हणजे 6,053 इतकी नोंदली गेली. केरळमध्ये काल 4,494 रुग्ण बरे झाले तर पश्चिम बंगाल मध्ये 2,342 रोगमुक्त झाले.
नवीन रुग्णांपैकी 75.69% रुग्ण 10 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये आहेत.
केरळमध्ये गेल्या चोवीस तासांत सर्वाधिक 3,423 नवे रुग्ण आढळले. काल महाराष्ट्रात 2,834 तर पश्चिम बंगालमध्ये 1,515 नवीन रुग्णांची नोंद झाली.
गेल्या 24 तासात 301 जणांचा मृत्यू झाला. यापैकी 76.74% मृत्यू दहा राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमध्ये झाले आहेत.
काल मृत्यू झालेल्यांपैकी 18.27% म्हणजेच 55 मृत्यू महाराष्ट्रात झाले आहेत. पश्चिम बंगालमध्ये 41 आणि केरळमध्ये 27 रुग्णांचा काल मृत्यू झाला.