भारतीय कृषी संशोधन परिषद, नवी दिल्ली यांनी आज आभासी प्रणालीच्या माध्यमातून “आंतरराष्ट्रीय महिला दिन – 2021” साजरा केला. आंतरराष्ट्रीय महिला दिन हा मानवी जीवनातील विविध आघाड्यांवर महिलांच्या महत्त्वपूर्ण योगदानाचा गौरव करण्याचा, तो साजरा करण्याचा दिवस आहे असे केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री पुरुषोत्तम रुपाला यावेळी म्हणाले. प्रत्येक क्षेत्रात महिला सशक्तीकरण करण्याच्या उद्देशाने राबवल्या जात असलेल्या केंद्र सरकारच्या विविध योजनांवर त्यांनी प्रकाश टाकला. विज्ञान, राजकारण, अभियांत्रिकी, औषधे, कला, खेळ, शिक्षण, शेती आणि सैन्य यासह सर्वच क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने “स्त्री शक्ती” खांद्याला खांदा लावून काम करत आहे असे ते म्हणाले.
केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी असे नमूद केले की महिला प्रत्येक क्षेत्रात अग्रेसर आहेत आणि कृषी व शेती क्षेत्रात महिलांचे योगदान कौतुकास्पद आहे. त्यांच्या मेहनतीचा, कर्तृत्वाचा देशाला अभिमान वाटतो असे त्यांनी सांगितले. पंतप्रधानांच्या “बेटी बचाओ, बेटी पढाओ” या महिला-केंद्रित फलदायी योजनेची रूपरेषा त्यांनी सांगितली. या योजनांमुळे महिलांना सन्मानाने आणि स्वावलंबी आयुष्य जगण्यास मदत करण्यासाठी विविध आघाड्यांवर सक्षम बनवले आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचे उद्दीष्ट साकारण्यात महिलांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे, यावर चौधरी यांनी भर दिला.
कृषी व शेती क्षेत्रात केलेल्या अतुलनीय योगदानाबद्दल अनेक महिलांचा सत्कारही या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. भारतीय कृषी संशोधन परिषदेच्या (आय.सी.ए.आर.) विविध पत्रिकांचे प्रकाशनही यावेळी करण्यात आले.