राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या कमी होत असून एकूण परिस्थिती नियंत्रणात आहे. फारच कमी रुग्णांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज पडत आहे. चाचण्यांच्या संख्येत वाढ करणे आणि जास्तीतजास्त लोकांचे लसीकरण करणे यासाठी सरकार पूर्ण क्षमतेने काम करत आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, “राज्यात गेल्या काही दिवसांपासून दैनंदिन करोना रुग्णसंख्या ४० हजारांच्या घरात आहे. मात्र, यात काल काहीशी घट दिसून आली. काल दिवसभरात राज्यात ३९,२०७ नव्या कोरोनाबाधितांची भर पडली आहे. राज्यातील दैनंदिन कोरोनाबाधितांची संख्या आता कमी होत चालली आहे.”
राज्यात काल ५३ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३८,८२४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्याचा मृत्यूदर १.९५ टक्के झाला आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३२ टक्के आहे. सध्या राज्यात २३ लाख ४४ हजार ९१९ व्यक्ती गृहविलगीकरणात आहेत तर २९६० जण संस्थात्मक विलगीकरणात आहेत.