ग्रामीण क्षेत्राचा विकास हा शेती व शेतीवर आधारित व्यवसायांवर अवलंबून असतो. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळवून द्यावयाचे झाल्यास, शेत पिकांसाठी पाण्याची सोय होणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध व्हावी म्हणून नदी प्रवाहाच्या मार्गात पूलवजा बंधारे उभारुन शाश्वत सिंचन सुविधा उभारण्यात येणार आहे, असे जलसंपदा राज्यमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांनी आज सांगितले. या उपक्रमामुळे संत्रा बागायतदारांसह इतर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होईल तसेच शेतशिवारात पोहोचण्यासाठी पाणंद रस्ताही उपयोगी ठरणार, असेही त्यांनी सांगितले.
चांदूर बाजार तालुक्यातील चिंचोली (ब्राम्हणवाडा) येथे राज्यमंत्री श्री. कडू यांच्या हस्ते तीन ठिकाणच्या 3 कोटी रुपयांच्या पूलवजा बंधारा निर्मितीच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. जलसंपदा विभाग, लघु पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ अभियंता, शलाका कन्स्ट्रक्शन कंपनीचे नानाभाऊ ठाकरे आदी यावेळी उपस्थित होते.
श्री. कडू म्हणाले, राज्यात सिंचनाचा अनुशेष सर्वात जास्त विदर्भात आहे. सिंचनाअभावी विदर्भाच्या काळ्या कसदार जमीनीची अत्युच्च उत्पादकता असूनही शेतकरी प्रति हेक्टरी उत्पादकता वाढविण्यात कमी पडत आहे. शाश्वत सिंचन नसल्यामुळे वर्षात केवळ खरीप हंगामातील पीकांवरच शेतकरी अवलंबून राहतो. पंरतु, रब्बी व खरीप अशा दोन्ही हंगामात बंधाऱ्याच्या माध्यमातून पाण्याची उपलब्धता झाल्यास त्या त्या क्षेत्रातील बागायतदार शेतकऱ्यांसह इतर शेतकऱ्यांनाही सिंचनाची सुविधा उपलब्ध होईल. पर्यायाने शेत पिक उत्पादनात वाढ होईल, त्यांना आर्थिक स्थैर्य प्राप्त झाल्यास शेतकरी बांधव सुखावला जाणार. विदर्भातील सिंचनाचे प्रमाण वाढून जास्तीत जास्त संख्येने शेतकरी बागायतदार व्हावे, या उद्देशाने शासनाने शाश्वत सिंचनासाठी विदर्भ सघन सिंचन विकास कार्यक्रम आणला आहे. या उपक्रमाचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
चांदुर बाजार तालुक्यातील मौजा चिंचोली येथे पूलवजा बंधारा बांधण्यात येणार असून या कामाची अंदाजित किंमत 1 कोटी 5 लक्ष एवढी आहे. तसेच मौजा गौरखेडा येथे दोन ठीकाणी 1 कोटीचे पूलवजा बंधारे उभारण्यात येणार आहे. हे बंधारा बांधकामाचे काम शलाका कन्स्ट्रक्शन कंपनीद्वारे करण्यात येणार आहे. या बंधाऱ्याच्या बांधकामामुळे त्या क्षेत्रातील शेतकऱ्यांना खऱ्या अर्थान शाश्वत सिंचन सुविधा उपलब्ध होणार आहे. बंधाऱ्याच्या माध्यमातून तेथील संत्रा बागायतदारांसह इतर शेतकऱ्यांनाही खूप मोठा दिलासा मिळणार आहे, असेही श्री. कडू यांनी सांगितले.