यंदाच्या गाळप हंगामात कारखाने इथेनॉल निर्मिती वाढविणार

खा. शरद पवार यांची माहिती; उठाव कमी असल्याने निर्णय

यंदाच्या वर्षी ऊसाचे उत्पादन वाढणार,गाळप कसं करायचं हा यक्ष प्रश्न आहे. त्यातच आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेला उठाव नाही. म्हणून यंदा 25 ते 30 टक्के साखर उत्पादन कमी करून इतकं इथेनॉल बनवायचे असा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आल्याचे खा. शरद पवार यांनी सांगितले.

पुण्यातील मांजरी येथील वसंतदादा शुगर इंस्टीटयूट येथे राज्यातील साखर उद्योगाच्या  प्रश्नावर बैठक झाली. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पवार म्हणाले, साखर तयार करताना आणखी काय पर्याय असू शकतो याबाबत बैठकीत विचार झाला. आंतरराष्ट्रीय बाजारात साखरेच्या किमतीला मर्यादा आहेत. त्यामुळे, 25 ते 30 टक्के कमी करून त्याच साखरेपासून इथेनॉल निर्मिती होऊ शकते आज हाच निष्कर्ष या बैठकीत घेण्यात आला. त्यासाठी चे कॉस्टिंग काढण्यात आले, केंद्राचा धोरण, देशाची आणि राज्याची गरज लक्षात घेता इथेनॉल निर्मितीचा निर्णय घेतला आहे. म्हणून 25 ते 30 टक्के साखर उत्पादन कमी करण्याचा निर्णय घेतला आता हे सरकारला कळवू. या बैठकीला जाणकार लोक होते असे त्यांनी सांगितले.

नवीन दिशा या क्षेत्राला या निमित्ताने मिळाली आहे. साखरेला जी किंमत मिळेल तीच इथेनॉल ला मिळेल, याशिवाय वेळही कमी लागतो. पंतप्रधान मोदींनी  इथेनॉल बाबतचे जे धोरण जाहीर केलं ते परवडणारे व साखर उद्योगाला अनुकूल आहे, असेही ते म्हणाले.