Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

असा आहे सिंधुताईंचा संघर्षमय प्रवास

एकदा पुण्यात रस्त्यावर माईना एक मुलगा रडत बसलेला दिसला, त्याला त्याचे नाव दीपक गायकवाड एवढेच सांगता येत होते. माई मुलाला घेऊन पोलीस स्टेशनला गेल्या व त्यांनी तक्रार नोंदवून घेतली नाही आणि हुसकून लावले. माईंनी मात्र मुलाला सांभाळण्याचे ठरवले, पुढे महिन्याभरात अशीच भीक मागणारी २-३ मुले त्यांना भेटली. त्यानांही आपल्या पदराखाली घेतले. निराश्रीतांचे जगणे किती भयंकर असते ते त्यांनी अनुभवले होते. ते या मुलांच्या वाट्याला येऊ नये ही त्यांची इच्छा होती. सिंधुताईनां लोक प्रेमाने माई म्हणतात. माई मुळच्या विदर्भातल्या, त्यांचे वडील अभिमान साठे गुरे वाळण्याचं काम करायचे. नवरगाव हे अतिशय मागासलेले, शहरी सुविधाचा स्पर्श नसलेले. कुणालाही शिक्षणाचा गंध नाही, अशा परिस्थितीत अभिमान साठे पिंपरी गावात आले.

माईना बेदम मारहाण:
चिंधी म्हणजेच सिंधुताई ही त्यांची सर्वात मोठी मुलगी. सिंधुताईंना एक भाऊ आणि एक बहिण आहे. मुलीनं शिकावे अशी त्यांच्या वडिलांची खूप इच्छा होती पण आईचा मात्र सक्त विरोध होता म्हणुन माईंना गुर राखायला पाठवत असे. इकडे माई शाळेत जाऊन बसत. माई मुळच्या बुद्धिमान पण जेमतेम मराठीच शिकता आले. अल्पवयात लग्न झाले. चिंधा साठे ची चिंधाबाई श्रीहरी सपकाळ झाली. लग्नाच्या वेळी माईचे वय होते अकरा वर्ष आणि नवऱ्याचे वय तीस वर्ष. घरी प्रचंड सासुरवास आणि ढोर मेहनत करावी लागत असे. अठराव्या वर्षापर्यंत माईची तीन बाळंतपण झाली. त्या चौथ्या वेळी गर्भवती असताना त्यांनी त्यांच्या जीवनातील पहिला संघर्ष केला. तेव्हा गुर वळणे हा त्यांचा व्यवसाय होता.

गुरं ही शेकड्याने असायची, त्यांचे शेण काढता काढता कंबर मोडायचे. स्त्रिया शेण काढून अर्धमेल्या होऊन जात. पण त्या बद्दल त्यांना कोणतीही मजुरी मिळायची नाही, म्हणून माईंनी बंड पुकारले. माई हा लढा जिंकल्या पण या लढ्याची किमत त्यांना चुकवावी लागली. बाईच्या या धैर्यामूळे गावातील जमीनदार दमडाजी असतकर दुखावला गेला. कारण जंगल खात्यातून येणारी मिळकत बंद झाली आणि गावक-यांना माईचे नवीन नेतृत्व मिळाले. याचा काटा काढण्यासाठी, माईच्या पोटातील मूल आपलं असल्याच खोटा प्रचार दमडाजीने सुरु केला. यामुळे श्रीहरी सपकाळ यांच्या मनात माईच्या चारित्र्याबद्दल संशय निर्माण झाला. त्यांनी माईना बेदम मारहाण केली आणि घराबाहेर काढले व त्यांना गोठ्यात आणून टाकले. त्या अवस्थेत त्यांची कन्या जन्माला आली. पतीने हकल्यानंतर गावक-यांनीही त्यांना हाकलून दिले.

 

स्मशानात राहू लागल्या माई:
माराने अर्धमेल्या झालेल्या माई माहेरी आल्या पण सख्या आईनेही पाठ फिरवली. पोट भरण्यासाठी भिक मागण्याची वेळ माईवर आली. परभणी, नांदेड, मनमाड स्टेशनवर त्या भीक मागत असत व स्टेशनवरच झोपत असत. स्टेशनवरच्या उघड्यावर राहणे शक्य नसल्याने माईंनी स्मशान गाठले. त्या स्मशानात राहू लागल्या. पण पोटातल्या भुकेचा काय? एक मृत देह आला. अंत्यसंस्कार झाले. अंत्यविधी करून लोक निघाले. एखादा पैसा हातावर पडेल म्हणून माई त्यांच्या मागे चालू लागल्या, एकाला त्यांची दया आली. त्याने त्यांना थोडे पीठ आणि पैसे दिले. माईंनी मडक्यात पीठ कालवले, चितेवरच्या निखाऱ्यावर भाजले आणि कडक भाकरी केली व तशीच खाल्ली.

त्यांनी अनेक खडतर प्रसंगाना तोंड देत देत हजारों अनाथ मुलांचा सांभाळ केला आहे. त्यांना 2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने (Padma Shri in 2021 in Social Work category) सन्मानित करण्यात आलं होतं. त्या 75 वर्षे वयाच्या होत्या.

ममता बाल सदन संस्थेची स्थापना
मुळच्याच बुद्धिमान असल्या तरी जेमतेम मराठी शाळेत चौथीपर्यंत शिकता आलं होतं. वयाच्या नवव्या वर्षी त्यांचं लग्न झालं होतं. त्यांच्या आयुष्यातील संघर्षाने त्यांना समाजसेवेकडे वळवलं. अनाथ मुलांना सांभाळून त्यांच्या जीवनाला दिशा देण्यासाठी सिंधुताई यांनी ममता बाल सदन संस्थेची स्थापना केली होती. १९९४ साली पुण्याजवळ पुरंदर तालुक्यात कुंभारवळण या गावात ही संस्था सुरु झाली. आपली कन्या ममता हिला दगडूशेठ हलवाई संस्थेच्या माध्यमातून शिक्षणासाठी सेवासदन येथे दाखल केले आणि त्यांनी इतर अनाथ आणि बेवारस मुलांना आधार दिला. येथे लहान मुलांना सर्व शिक्षण दिले जाते. त्यांच्या भोजन, कपडे अन्य सुविधा यांची उपलब्धता संस्थेकडून केली जाते. शिक्षण पूर्ण झाल्यावर येथील मुले आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होतील यासाठीही त्यांना मार्गदर्शन दिले जाते. आर्थिक दृष्ट्या स्वयंपूर्ण झाल्यावर या युवक युवतींना योग्य जोडीदार शोधून देणे आणि त्यांच्या विवाहाचे आयोजन करणे हे कार्यही संस्थेकडूनच केले जाते. अशी सुमारे १०५० मुले या संस्थेत राहिलेली आहेत.

माईंचे चार अनाथ आश्रम:
आज महाराष्ट्रात माईंचे चार अनाथआश्रम आहेत काही वर्षांपूर्वी माईंनी चिखल दऱ्यात वसतीगृह सुरु केले. आज बऱ्याच मुली या ठिकाणी राहून शिक्षण घेत आहे. दोन दिवसाच्या मुलापासून ७२ वर्षाच्या वृध्दापर्यंत सगळीच त्यांची मुले आहे. लेकीच्या मुलींचे आडनाव साठे तर मुलांचा नाव सपकाळ असते. बरीचशी मुले शिकून स्वतःच्या पायावर उभी आहेत. माझी मुले डॉक्टर, वकील, शिक्षक आहेत. हे सांगताना त्यांचा चेहरा फुलून येतो. ममताने ही MSW आहे. ती आता माईचे काम पाहते.

अनाथांच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य
माईंनी अनाथांच्या कल्याणासाठी अवघे आयुष्य वेचले. त्यांचे संघर्षमय आयुष्य प्रत्येकासाठी प्रेरणादायी आहे. निस्वार्थ समाजसेवा कशी असावी याचे उत्तम उदाहरण म्हणजे माई. त्यांचा प्रेमळ स्वभाव व वात्सल्यमयी व्यक्तिमत्व या माध्यमातून त्यांनी असंख्य भारतीयांच्या मनात घर निर्माण केले. अनाथांची माय होताना त्यांच्या व्यथा वेदनांशी त्या एकरूप झाल्या. बेटा असे संबोधत त्यांनी अनेकांवर मायेचा वर्षाव केला.
स्वतःचं दुःख बाजूला सारून दुसऱ्यांचे डोळे पुसणाऱ्या काळजातील आभाळ माया अनाथांच्या जगावर पांघरणाऱ्या माईंचे कार्य अतिशय मोलाचे होते. हजारो अनाथ मुलांच्या आश्रयदात्या म्हणून त्यांना २०१२ साली डॉ बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कारही मिळाला होता. तसेच नुकतच त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. आपल्या संपूर्ण आयुष्यभरात ७५२ राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार ही त्यांच्या कार्याची पोचपावती होती. अतिशय संघर्षाच्या अशा परिस्थितीत त्यांच्या आयुष्यातील बराचसा काळ गेला. त्यांच्या जाण्याने महाराष्ट्राच्या समाज जीवनात आपल्या कामाने आदर्श निर्माण करणारी, अनेक निराधारांच्या आयुष्यातील मायेची सावली हरपली आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या पद्मश्री सिंधुताईंना भावपूर्ण श्रद्धांजली.

Exit mobile version