शेतीला मिळाली जोडधंद्याची साथ

मी दिनेश पोपट सुर्यवंशी, भाजी स्टॉल धारक, मुंगसे, ता.मालेगाव, जिल्हा नाशिक. माझी स्वत:ची ॲपे रिक्षा आहे. मात्र कोरोनाच्या कालावधीत लॉकडाऊनमुळं ॲपे रिक्षाचा व्यवसाय ठप्प झाला. म्हणून मी शेतीला जोडधंदा म्हणून भाजीपाला विक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे. रोज सकाळी 5 वाजता उठल्यानंतर स्टॉलवर येवून स्टॉल उभारण्यासह स्वत:च्या शेतातील व लगतच्या शेतकऱ्यांकडून शेतमाल घेवून माल विक्री सुरू करत असतो. माल जमा करतेवेळी माझे वडील पोपट केदा सुर्यवंशी हे भाजी स्टॉलवर बसतात. दररोज सकाळी 5 ते संध्याकाळी 8 वाजेपर्यंत आमच्या स्टॉलवर शेतमालाची विक्री होत असते. मुंबई आग्रा महामार्गालगतच्या हॉटेल व्यावसायिकांनाही मी भाजी पुरवित आहे. तसेच मुंगसे व सोनज गावातील गावकरीही माझ्याचकडून भाजी खरेदी करत आहेत. त्यामुळे मला आर्थिक लाभ होत आहे. शेतीबरोबर केलेला हा जोडधंदा मला लाभ देणारा ठरत आहे.

 

कृषी विभागामार्फत मला स्टॉल मिळाल्यानं मोठा दिलासा मिळाला आहे. दुसऱ्याकडं मोलमजुरी करण्यापेक्षा बेरोजगारांच्या हाताला काम देऊन शेतकऱ्यांसाठी राबविलेला हा उपक्रम चांगला आहे. शेतकरी ते थेट ग्राहक ही योजना अतिशय उपयुक्त ठरत असून ग्राहकांनाही याचा फायदा होत आहे. या योजनेमुळं मला आर्थिक स्थैर्य प्राप्त झाले असून याबद्दल मी शासनाचे आभार मानतो.

 

– दिनेश पोपट सुर्यवंशीमुंगसे, ता.मालेगांव, जि.नाशिक