Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

ग्रामीण आरोग्य यंत्रणा अधिक बळकट करणार

जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर बेड, उपचार साधनसामग्री, औषधीसाठा यासोबत ऑक्सीजन उपलब्धतेसाठी शासन, प्रशासनाद्वारे आवश्यक उपाययोजना करण्यात येत आहे. ग्रामीण भागात कोरोना साथीवर नियंत्रण मिळविणे आवश्यक आहे, त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक प्राथमिक आरोग्य केंद्रात 30 ऑक्सीजन बेड तर उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन बेडसह आयसीयुची सुविधा उभारण्यात येणार आहे, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड.यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठक प्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मनपा आयुक्त प्रशांत रोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांच्यासह आरोग्य यंत्रणेचे अधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या की, ग्रामीण भागात रूग्णसंख्या वाढू नये म्हणून प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य सुविधा व उपचार सामग्री सुसज्ज करण्यात येणार आहे. ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणांना बळकट करण्यासाठी उर्जा मंत्री नितीन राऊत याच्या मदतीने सीएसआर फंडातून जिल्ह्यासाठी सुमारे पाच कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. यातून जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय याठिकाणी ऑक्सीजन बेडसह वैद्यकीय सुविधा सुसज्ज करण्यात येणार आहे. रेमडेसिवीर इंन्जेक्शनचा तुटवडा आहे असे जिल्ह्यात चित्र नाही, रेमडेसिवीरची मागणी वाढविण्यात आली असून गरजूंना मागणीनुसार रेमडेसिवीर तत्काळ उपलब्ध करुन देण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले.

त्या पुढे म्हणाल्या की, जिल्ह्यात आठ ठिकाणी ऑक्सीजन निर्मिती  केंद्र स्थापित करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. जिल्हा सामान्य रुग्णालयात पाईपद्वारे ऑक्सीजन पुरवठा प्रणाली कार्यान्वित झाली आहे. याचप्रमाणे प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आरोग्य केंद्रात ऑक्सीजन टँकची सुविधा उभारण्यात येणार असल्याने ग्रामीण भागात ऑक्सीजनची कमतरता भरुन निघणार आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागातील नागरिकांनी कोरोनाची भिती बाळगू नये, आजाराची लक्षणे दिसल्यावर तत्काळ डॉक्टरांकडून तपासणी करुन चाचणी करुन घ्यावी. कोरोना व रेमडेसिवीरचा तुटवडा संदर्भातील अफवांवर विश्वास ठेवू नये. रेमडेसिवीर संदर्भात कोणीही अफवा फैलवू नये, अफवा फैलावणाऱ्यांवर प्रशासनाकडून कारवाई करण्यात येईल. बेड, औषधी, ॲम्ब्युलन्स संदर्भात कोणालाही काही तक्रार द्यावयाची असल्यास जिल्हा प्रशासनाशी किंवा तक्रार केंद्रावर संपर्क साधावा. नागरिकांच्या तक्रारीचा तत्काळ निपटारा करण्याचे निर्देश त्यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

जिल्हाधिकारी श्री. नवाल म्हणाले की, कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी ग्रामीण भागातील आरोग्य यंत्रणा सुसज्ज करण्यावर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रात जीवनावश्यक मापदंडानुसार आवश्यक मुलभूत आरोग्य सुविधा त्याठिकाणी उभारण्यात येणार आहे. तालुका स्तरावरील उपजिल्हा रुग्णालयात ऑक्सीजन बेडसह आयसीयु कार्यान्वित करण्यात येणार असून पुरेसा औषधांचा साठा त्याठिकाणी उपलब्ध राहणार आहे. कोरोना संकटकाळात तत्काळ उपचार होण्यासाठी मदत कक्षांची स्थापना करण्यात येणार आहे. नागरिकांनी कोरोनाला न भिता, अनावश्यक चिंतेत न पडता, लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी व डॉक्टरांकडून किंवा लगतच्या आरोग्य केंद्रात वैद्यकीय उपचार घ्यावा. कोरोनाला हरविण्यासाठी सर्व नागरिकांची साथ असणे गरजेचे असून प्रशासनाने ठरवून दिलेले प्रतिबंध व कोरोना त्रिसुत्रीचे जाणीवपूर्वक पालन करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version