महाबळेश्वर तालुक्यातील खिंगर गावाच्या देवीची आरास यात्रेच्या निमित्ताने स्ट्रॉबेरीच्या साहाय्याने केल्याने गावचे जन्नी माता मंदिराचा गाभारा सर्वांचेच आकर्षण ठरला आहे.
उंचीवर असणाऱ्या थंड हवेच्या महाबळेश्वर तालुक्याचे स्ट्रॉबेरी हे वैशिष्ट्य आहे. खिंगर या गावातही मोठ्या प्रमाणात स्ट्रॉबेरी घेतली जाते. त्यामुळे ग्रामस्थ व युवकांनी आपल्या स्ट्रॉबेरीच्या साहाय्याने आज जन्नी मातेच्या गाभाऱ्याची आकर्षक अशी सजावट केली आहे. आज आणि उद्या खिंगर गावची यात्रा असून या निमित्ताने युवक व ग्रामस्थांनी केलेली ही सजावट सर्वांचेच आकर्षण ठरत आहे.
याबाबत बोलताना उपसरपंच विठ्ठल दुधाणे यांनी सांगितले स्ट्रॉबेरीवर आमच्या गावचे जीवनमान अवलंबून आहे. त्यामुळे गावातील शेतकऱ्याचे स्ट्रॉबेरी जीव की प्राण आहे त्यामुळे यावर्षी आम्ही स्ट्रॉबेरीच्या साहाय्यानेच पूजा करण्याचे नियोजन केले आहे.