नैसर्गिक आपत्तीत राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी

– महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्र सरकारने महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी

मुंबई, दि. १६ : यावर्षीच्या पावसाने आधी विदर्भात पूरस्थिती निर्माण केली होती तर आता परतीच्या पावसाचाही मोठा फटका सोलापूर, उस्मानाबाद, पुणे, सांगलीसह राज्याच्या इतर भागालाही बसला आहे. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभी पिकेही वाया गेली आहेत. या नैसर्गिक आपत्तीच्या वेळी राज्य सरकार शेतकऱ्यांचा पाठिशी खंबीरपणे उभे असून नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याचे आदेश दिलेले आहेत. राज्य सरकार केंद्र सरकारकडे मदतीसाठी प्रस्ताव पाठवेल पण केंद्र सरकारनेही त्यासाठी भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे.

महसूल मंत्री श्री. थोरात म्हणाले, केंद्र सरकारने राज्याला भरीव मदत देण्याची आवश्यकता आहे. आतापर्यंतचा अनुभव पाहता केंद्राकडून तुटपुंजीच मदत केली गेली आहे. आता तर राज्य सरकारसमोर कोरोना संकटामुळे मोठ्या आर्थिक अडचणी आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करुन राज्याला जास्तीत जास्त मदत मिळावी यासाठी प्रयत्न करतील, असेही श्री. थोरात म्हणाले.

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतला पुणे जिल्ह्यातील अतिवृष्टी आणि पूरस्थितीचा आढावा

परतीचा पाऊस, वादळीवारे आणि अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री अजित पवार तथा पुणे जिल्हा पालकमंत्री यांनी विविध यंत्रणांकडून आढावा घेतला. हवामान खात्याच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस पाऊस पडण्याची शक्यता लक्षात घेवून प्रशासकीय यंत्रणांना सतर्कतेचे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. सोलापूर, पंढरपूर आणि बारामती या चार ठिकाणी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल- एनडीआरफच्या तुकड्या तैनात केल्या आहेत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

उपमुख्यंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी, वादळी पावसामुळे पिकांचे नुकसान याबाबत तसेच घरांची पडझड, मालमत्तांचे नुकसान यांचेही तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. स्थलांतरीत नागरिकांना जेवण, निवाऱ्यासोबतच इत्यादी मुलभूत सुविधा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन द्याव्यात. सोलापूर, पंढरपूर, बारामती तसेच विभागातील इतर नुकसानग्रस्त भागातील नागरिकांची जनजीवन पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासनाने तात्काळ कार्यवाही करावी, असे निर्देशही उपमुख्यंत्री श्री.पवार यांनी दिले.