हिवाळी अधिवेशनाला प्रारंभ; २६ विधेयके व अध्यादेश मांडणार

मुंबई, दि. 22 : विधानमंडळाच्या हिवाळी अधिवेशनास आजपासून सुरूवात झाली.  हिवाळी अधिवेशनात जवळपास 26 विधेयके चर्चेला घेण्यात येणार आहेत. यामध्ये प्रलंबित विधेयके पाच, प्रस्तावित (मंत्रिमंडळ मान्यता प्राप्त) 21 विधेयके अशी एकूण 26 विधेयके व अध्यादेश या अधिवेशनात मांडण्यात येणार आहेत.

या अधिवेशनामध्ये महत्वाचे शक्ति फौजदारी कायदा (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2020, हे विधेयक मांडण्यात येणार आहे. तसेच केंद्र सरकारने शेतकरी संबंधित तीन कायदे मागे घेतल्याने शेतकरी (सक्षमीकरण व संरक्षण) किंमत आश्वासन व कृषी सेवा करार (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, शेतकरी उत्पन्न व्यापार व वाणिज्य (प्रचालन व सुलभीकरण) (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, अत्यावश्यक वस्तू (महाराष्ट्र सुधारणा) विधेयक, 2021, ही विधेयके मागे घेण्यात येणार आहेत.

विधानसभेत वंदे मातरम्‌ने सकाळी 11 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यासह सन्माननीय मंत्री  आणि विधानसभा सदस्य उपस्थित होते. विधान परिषदेत वंदे मातरम्‌ने आज दुपारी 12 वाजता कामकाजास सुरुवात झाली. विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, उपमुख्यमंत्री अजित पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह सन्माननीय मंत्री  आणि विधान परिषदेचे सदस्य उपस्थित होते.