राज्यातील दहावीचा निकाल आज दि. 16 जुलै रोजी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर झाला आहे. यंदा ९९.९५ % परीक्षार्थी उतीर्ण होणे हे यंदाच्या निकालाचे वैशिष्ट्य आहे. कोकण विभागाचा निकाल शंभर टक्के तर अन्य विभागांचा निकाल 99 टक्यांहून अधिक लागला आहे. राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाची इयत्ता दहावी उत्तीर्ण झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून उत्तीर्ण विद्यार्थ्यांनी आपापल्या आवडीचे क्षेत्र निवडून यशस्वी व्हावे, आनंदी जीवन जगावे, यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत सन 2021 मध्ये माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर जाहीर झाला. मात्र निकाल पाहण्यासाठी अनेकांनी online गर्दी केल्याने सर्वरला अडचणी निर्माण झाल्याच्या तक्रारी होत्या.
मंडळामार्फत माध्यमिक प्रमाणपत्र (इ.10वी) लेखी परीक्षा दि.२९ एप्रिल २०२१ ते दि.२० मे २०२१ या कालावधीत आयोजित करण्यात आली होती. शासन निर्णय दि.१२ मे, २०२१ नुसार परीक्षा रद्द करण्यात आली होती. शासन निर्णय दि. २८ मे, २०२१ च्या नुसार इ.१० वीसाठी मूल्यमापन कार्यपद्धती जाहीर केली होती. दि.१० जून, २०२१ रोजी मूल्यमापन कार्यपद्धतीबाबत शिक्षकांचे प्रशिक्षण व वेबिनार घेण्यात आले. दि.२३ जून, २०२१ ते दि.०२ जुलै, २०२१ माध्यमिक शाळांनी संगणक प्रणालीमध्ये गुण नोंदविले होते.
इयत्ता दहावीची एकूण प्रविष्ट विद्यार्थी संख्या
सन 2021 च्या इयत्ता दहावीत एकूण मुले- 9 लाख 9 हजार 931 प्रविष्ट होते, तर मुली -7 लाख 78 हजार 693 असे एकूण- 16 लाख 58 हजार 624 विद्यार्थी प्रविष्ट होते. एकूण आठ माध्यमानुसार विद्यार्थी प्रविष्ट आहेत.
राज्य मंडळ स्तरावर दि.3 जुलै 2021 ते दि. 15 जुलै, 2021 अखेर या दरम्यान मंडळामार्फत निकाल तयार करण्याची कार्यवाही करण्यात आली.
संकेतस्थळावर निकाल
माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र ( इ.10 वी ) परीक्षा सन 2021 साठी नोंदणी केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय संपादित केलेले गुण http: //result.mh-ssc.ac.in या सकेतस्थळावर उपलब्ध होतील व या माहितीची प्रत (प्रिंट) घेता येईल. मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ http: //result.mh-ssc.ac.in असे आहे. तसेच www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर शाळाना एकत्रित निकाल उपलब्ध होईल.
सन 2021 माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षा शासन निर्णयानुसार रद्द करण्यात आल्यामुळे शासन निर्णयातील मूल्यमापन कार्यपद्धतीनुसार इ. 9 वीचा अंतिम निकाल, 10 वीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापन व इ.10 वीचे अंतिम तोंडी/प्रात्यक्षिक अंतर्गत मूल्यमापन इत्यादींच्या आधारे माध्यमिक शाळामार्फत विद्यार्थ्यांना विषयनिहाय गुणदान करण्यात आले आहे. त्याप्रमाणे मंडळाने विहित कार्यपद्धतीनुसार या परीक्षेचा निकाल तयार करण्याची प्रक्रिया केली.
नागपूर विभाग- ९९.८४ टक्के
अमरावती विभाग- ९९.९८ टक्के
कोकण विभाग- १०० टक्के
पुणे विभाग- ९९.९६ टक्के
मुंबई विभाग- ९९.९६ टक्के
नाशिक विभाग- ९९.९६ टक्के
कोल्हापूर विभाग- ९९.९२ टक्के