Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

शंभर रुपयांच्या विशेष नाण्याचे पंतप्रधानांनी केले अनावरण

राजमाता विजयाराजेंच्या स्मरणार्थ शंभर रुपयांचे नाणे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजमाता विजया राजे शिंदे यांच्या स्मरणार्थ 100 रुपयांच्या विशेष नाण्याचे आज अनावरण करण्यात आले. व्हिडिओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून हा कार्यक्रम झाला. यावेळी मोदी यांनी राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांना आदरांजली अर्पण केली.

राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या स्मरणार्थ  100 रुपयांच्या विशेष  नाण्याचे अनावरण करण्याची संधी मिळत असल्याबद्दल आपण स्वतःला भाग्यवान समजत आहे, असे पंतप्रधान मोदी यांनी यावेळी नमूद केले. यावेळी बोलताना पंतप्रधान म्हणाले, भारताला योग्य दिशेने नेण्यासाठी नेतृत्व करणा-यांपैकी एक राजमाता विजयाराजे शिंदे  होत्या. त्या धडाडीने निर्णय घेणा-या आणि कुशल प्रशासक होत्या. भारतीय राजकारणाच्या प्रत्येक महत्वाच्या टप्प्याच्या राजमाता साक्षीदार ठरल्या. मग त्यामध्ये परदेशी वस्त्रांची होळी करण्याचा काळ असो अथवा देशात जारी झालेल्या आणीबाणीचा काळ आणि राममंदिर जनआंदोलनाचा काळ असो, या सर्व महत्वापूर्ण घटनांच्या राजमाता विजयाराजे साक्षीदार होत्या. यामुळेच सध्याच्या पिढीला राजमाता यांच्या जीवनकार्याविषयी माहिती असणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले.

शंभर रुपयांचे नाणे चलनात येते का?

रिझर्व बँक ऑफ इंडिया दोन प्रकारची नाणी जारी करत असते. त्यापैकी एक असते चलनात सामान्यांच्या वितरणासाठी आणि दुसरे सन्मानासाठी. चलनामधील नाण्यांमध्ये सध्या १० रुपयांपर्यंतची नाणी आहेत. मात्र सन्मानार्थ असलेल्या नाण्यांमध्ये १०० रुपयांपासून तर हजार रुपयांपर्यंतच्या नाणे जारी करता येतात. मात्र ही नाणी चलनात आणता येत नाहीत. २५ डिसेंबर २०१८ रोजी दिवंगत पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ याच पद्धतीने १०० रुपयांचे नाणे जारी केले होते. असे सांगतात की या १०० रुपये किंमतीच्या या नाण्यांचे मूल्य प्रत्यक्षात जास्त असते. अगदी तीन ते साडेतीन हजार रुपयांपर्यंत किंमत मोजून संग्राहकांना आणि सामान्य नागरिकांना ते संग्रहित करण्यासाठी उपलब्ध होऊ शकते.

Exit mobile version