महात्मा गांधींनी ओदिशाला दिलेल्या पहिल्या भेटीला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने शिक्षण, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी एका विशेष टपाल तिकीटाचे डिजिटली अनावरण केले. यासाठीचा सार्वजनिक समारंभ ओदिशातील कटक येथील स्वराज आश्रम येथे आयोजित केला होता. कटकचे खासदार भर्तृहरी माहताब, ओदिशाच्या उडिया भाषा, पर्यटन व सांस्कृतिक मंत्री ज्योती प्रकाश पाणिग्राही व टपाल खात्याचे वरिष्ठ अधिकारी समारंभाला उपस्थित होते.
महात्मा गांधींनी 23 मार्च 1921 रोजी कटकला पहिल्यांदा भेट दिली होती. भारतीय इतिहासातील ही महत्वाची घटना या विशेष टपाल तिकाटाच्या माध्यमातून साजरी करण्यात येत आहे. या भेटीने असहकार चळवळीला वेगळी उर्जा दिली आणि भारतीय स्वातंत्र्ययुद्धाला बळ पुरविले. महात्मा गांधीच्या या भेटीत तरूण वर्ग मोठ्या प्रमाणावर चळवळीत सामील झाला , स्त्रियांनी चरख्यावरील सूत कताई आणि खादीचा स्वीकार केला, विलायती कापड नाकारले. महात्मा गांधींनी दिलेल्या भेटीच्या प्रभावाने ओदिशाने आळस झटकून राष्ट्रीय चळवळीत झोकून दिले.
भारत आज स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे असे शिक्षण, दूरसंचार आणि इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान खात्याचे केंद्रीय राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी यावेळी भाषणात सांगितले. महात्मा गांधींच्या प्रथम भेटीला 100 वर्षे झाल्याच्या स्मरणार्थ काढलेले विशेष टपाल तिकिट हा या महोत्सवाचाच भाग आहे. भारताच्या स्वातंत्र्ययुद्धातील विशेष टप्प्यांच्या स्मरणार्थ टपालखाते पुढेही अशी टपाल तिकिटे काढणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
‘एक भारत श्रेष्ठ भारत’ या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या द्रष्ट्या नेतृत्वात सुरू झालेल्या मोहिमेची महतीही धोत्रे यांनी यावेळी सांगितली. या मोहिमेत महाराष्ट्र व ओदिशा, गोवा-झारखंड, दिल्ली व सिक्किम अश्या विविध राज्यांच्या तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या जोड्या तयार केल्याचे त्यांनी सांगितले. त्यांनी परस्परांमध्ये एकमेकांची संस्कृती, भाषा, साहित्य, नृत्यकला आणि इतर अनेक वैशिष्ट्यांची देवघेव करावी हा यामागील उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे भारत देशातील परस्पर बंध मजबूत होतील. आजचा कार्यक्रम हा त्यादिशेने एक पाऊल असल्याचे त्यांनी नमूद केले.
आत अनावरण केलेले टपाल तिकिट तरूणवर्ग, स्त्रिया, बुद्धीवंतांचा वर्ग तसेच सामान्यांनाही प्रेरणा देत राहील. शंभर वर्षांपूर्वी वसाहतवादाच्या युगातील समाजाने पेललेल्या आव्हानांची कल्पनाही आजचा समाज करू शकणार नाही.
या विशेष टपाल तिकिटाच्या फर्स्ट डे कव्हरवर, महात्मा गांधींनी 23 मार्च 1921 रोजी कटकला दिलेल्या पहिल्या भेटीत वास्तव्य केलेल्या स्वराज आश्रमाचे चित्र आहे.
हे विशेष टपाल तिकीट, फर्स्ट डे कव्हर (FDC) आणि माहितीपत्रक देशाच्या कानाकोपऱ्यांमधील 76 फिलाटेलिक ब्युरोंमध्ये उपलब्ध असेल तसेच ई-पोस्टऑफिसद्वारे ऑनलाईन मागवता येईल ( https://www.epostoffice.gov.in/ला भेट द्या )