Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

मराठवा़ड्यातील कृषी आणि ग्रामीण पर्यटनासाठी लवकरच योजना?

मुंबई, दि. ३० : कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्याबाबत आज ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक संपन्न झाली. बैठकीस ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंदकुमार, पर्यटन संचालक दिलीप गावडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यमंत्री श्री. अब्दुल सत्तार यावेळी म्हणाले की, ग्रामविकास विभागामार्फत कोकणातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळांच्या ठिकाणी पायाभूत सुविधांच्या विकासासाठी निधी दिली जातो. अशीच योजना मराठवाड्यासाठी राबविता येईल. मराठवाड्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये अनेक ऐतिहासिक आणि पुरातन वास्तू, किल्ले, गुंफा, अभयारण्ये आदी पर्यटनस्थळे आहेत. याशिवाय कृषी आणि ग्रामीण पर्यटनालाही मराठवाड्यात मोठा वाव आहे. यातून मराठवाड्याच्या पर्यटनाला चालना मिळण्याबरोबरच मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मितीची क्षमता आहे. त्यामुळे येत्या काळात ग्रामविकास विभागामार्फत कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाच्या धर्तीवर मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रम राबविण्यात येईल. यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

यासाठी मराठवाडा ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्यात यावा, अशी सूचनाही राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी दिली. पर्यटन विभागाच्या सहयोगातून मराठवाड्यातील ग्रामीण भागातील पर्यटनस्थळे सुनिश्चित करुन त्यांचा विकास करणे, तिथे पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी ग्रामीण विकास विभागामार्फत निधीची उपलब्धता करुन देणे याबाबतही यावेळी चर्चा झाली.

Exit mobile version