स्मार्ट’ प्रकल्पामध्ये सर्व विभागातील शेतकऱ्यांना सामावण्याचे निर्देश

मुंबई, दि. 19 : शेतमालाच्या सर्वसमावेशक मूल्य साखळ्यांचा विकास करण्यासाठी मा.बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना लाभ मिळाला पाहिजे. या योजनेतून राज्यातील सर्व विभागांना प्रतिनिधित्व मिळाले पाहिजे अशा सूचना कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी आज येथे केले.

मंत्रालयात झालेल्या बैठकीत कृषिमंत्र्यांनी या प्रकल्पाचा आढावा घेतला. कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, आयुक्त धीरजकुमार, उपसचिव सुशिल खोडवेकर आदी यावेळी उपस्थित होते.

या प्रकल्पासाठी अर्ज करण्याकरिता पोर्टल सुरु करण्यात आले होते. त्यानुसार 11 हजार 584 लोकांनी नोंदणी केली असून 5 हजार 764 संस्थांनी अर्ज सादर केले आहेत. यामध्ये सुमारे 2 हजार शेतकरी उत्पादक कंपन्या असून 2 हजार 833 आत्मा नोंदणीकृत गट आहेत. महाराष्ट्र ग्रामीण जीवनोन्नती अभियानातील प्रभाग संघांचे 710 तर माविमच्या लोकसंचालित साधन केंद्राचे 262 अर्ज प्राप्त झाले आहेत.

शेतकऱ्यांच्या हितासाठी मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांच्या संकल्पातून विकेल ते पिकेल अभियान सुरु करण्यात आले असून या अंतर्गत या प्रकल्पाच्या माध्यमातून मूल्य साखळ्यांचा विकास सुरु केला जाणार आहे, असे कृषिमंत्री श्री. भुसे यांनी सांगितले.

यावेळी प्रकल्पांतर्गत केल्या जाणाऱ्या विविध कामासंदर्भात सादरीकरण करण्यात आले.