भारतीय निवडणूक आयोगाने आज अशोक लवासा यांना निरोप दिला, लवासा यांची आशियाई विकास बँक, मनिला, फिलीपाईन्स येथे उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अशोक लवासा यांनी जानेवारी 2018 मध्ये 23 वे निवडणूक आयुक्त म्हणून पदभार स्वीकारला होता आणि 31 ऑगस्ट 2020 पर्यंत ते कार्यरत होते.
त्यांच्या निरोप सोहळ्याप्रसंगी बोलताना मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी पुढील मोठी आव्हाने आणि मैलाचे टप्पे गाठण्यासाठी शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, हे निवडणूक आयोगाचे नुकसान आणि आशियाई विकास बँकेचा लाभ आहे, कोवीडनंतरच्या परिस्थितीत अर्थव्यवस्थांची पुनर्रचना हे मोठे आव्हान पार पाडण्यासाठी लवासा यांची क्षमता बहुपक्षीय व्यासपीठावर उपलब्ध होईल.
याप्रसंगी बोलताना निवडणूक आयुक्त सुशील चंद्र यांनी आपल्य भाषणात अशोक लवासा यांच्या अर्थमंत्रालयातील कार्याचे कौतुक केले. कोविड परिस्थितीत निवडणुकांसाठी व्यापक नियमावली तयार करण्याकामी लवासा यांनी केलेल्या मार्गदर्शनाचा त्यांनी विशेषत्वाने उल्लेख केला.
अशोक लवासा म्हणाले, निवडणूक आयोगातील अडीच वर्षाचा त्यांचा कार्यकाळ संस्मरणीय अनुभव आहे. निवडणूक आयोगात राहणे किंवा आशियाई विकास बँकेसारख्या जागतिक पटलावर जाणे यात निवड करणे नक्कीच अवघड होते, असे ते म्हणाले.