Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पुढील १५ ते २० दिवस शाळा बंदच राहणार

राज्यात गेले दोन दिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत काहीशी घट झाली होती, मात्र, राज्यात आज पुन्हा एकदा कोरोनाचे तब्बल 46 हजार नवे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. पुढील 15 – 20 दिवस शाळा अजून बंद राहतील अशी चर्चा आज झाली. त्यानंतर परिस्थिती पाहून निर्णय घेतला जाईल, असेही टोपे म्हणाले

राज्यातील सक्रीय रुग्णांची संख्या तब्बल 2 लाख 25 हजार इतकी असून त्यातील 86 टक्के रुग्ण होम क्वारंटाईन असल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “काही लोक सेल्फ किटद्वारे कोरोना टेस्ट करत आहेत. त्यात त्यांची चाचणी पॉझिटिव्ह असली तरी ते संबंधित विभागाला कळवत नाहीत. अशा लोकांनी जवळच्या आरोग्य केंद्रावर माहिती द्यायला हवी. सेल्फ टेस्टमध्ये कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला जास्त त्रास नसल्यास त्याला होम क्वारंटाईन राहू द्या, असा सुचना प्रशासनाला दिल्या आहेत. अशा रुग्णांना दिवसातून दोन वेळा फोन केला जाईल. आणि तुमच्याच्या प्रकृतीची माहिती घेतली जाईल.”

राज्यात लसीकरणाची गती वाढण्यासाठी जिल्हाधिकारी, आयुक्तांनी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांना पुढे आणले पाहिजे. लसीचे दोन्ही डोस घेतलेल्या लोकांनाच कार्यालयात प्रवेश देण्याचा विचार आता घ्यावा लागेल. ते जनहिताचं किंबहुना राज्याच्या हिताचे आहे, असेही टोपे यांनी सांगितले. राज्यात कोरोना लसीचा पहिला डोस घेतलेल्यांचे प्रमाण 90 टक्क्यांवर पोचले आहे. तर दुसरा डोस घेतलेल्या नागरिकांचे प्रमाण 62 टक्के आहे. तरीही आपण देशाच्या सरासरीपेक्षा थोडे कमी आहोत, अशी कबुलीही त्यांनी या वेळी दिली. सध्या 15 ते 18 या वयोगटातील मुलांचे 35 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे. याच गतीने पुढील 8 ते 10 दिवसांत या वयोगटातील लसीकरण पूर्ण होईल, अशी माहितीही त्यांनी या वेळी दिली.

कोव्हॅक्सिन आणि कोविशिल्ड लसी कमी पडत असल्याबाबत केंद्र सरकारला कळवणार आहोत. आज अनेक जिल्ह्यातून कोव्हॅक्सिन संपले म्हणून फोन येत आहेत. त्यासाठी लसीचा पुरवठा करण्याबाबत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांकडे मागणी केली आहे.

राजायत सध्या ऑक्सिजनची एकूण मागणी 400 मेट्रिक टन आहे. त्यात कोविड आणि नॉन कोविड अशा दोन्हींसाठी ही मागणी आहे. मात्र केवळ कोविडसाठी 700 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज लागल्यास लॉकडाऊन लावावा लागेल. पण सध्या नॉनकोविडसाठी अडीचशे तर कोविडसाठी दीडशे मेट्रिक टन ऑक्सिजन लागत आहे, असेही त्यांनी सांगितले.

Exit mobile version