क्षयरोग हा एक गंभीर आणि घातक आजार आहे. परंतु तो बरा करता येतो. म्हणूनच शासनाने या आजाराला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. एड्सच्या प्रसाराबरोबर क्षयरोग होण्याची आणि वाढण्याची शक्यता मनात धरली पाहिजे. कमी प्रतिकारशक्तीमुळे एड्स रुग्णाला झालेला क्षयरोग लवकर बरा होत नाही. एड्सग्रस्त क्षयरोगाचे जंतू औषधांना दाद देईनासे होतात. असे घातक जंतू पसरण्याचा मोठा धोका आहे.
असे आहे योजनेचे स्वरूप :
राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण योजना आता सर्वत्र लागू करण्यात आली आहे. यातला मुख्य भाग म्हणजे उपकेंद्रातील नर्स किंवा पुरुष आरोग्य कर्मचा-यांनी दोन प्राथमिक कामगि-या करणे अपेक्षित आहे. (अ) खाकरा-बेडक्याचा नमुना घेणे. (ब) क्षयरोगासाठी औषध वाटप करणे. यामुळे क्षयाचा आजार झालेल्या व्यक्तींना जवळच नियमित उपचार मिळू शकतील. उपकेंद्राबरोबरच गावोगावच्या आशा कार्यकर्त्यांकडे व खाजगी दवाखान्यातही अशाच प्रकारची सेवा मिळू लागली आहे.
काय सेवा मिळतात? :
या नवीन योजनेत खाकरा-बेडका घेण्याची पध्दत, औषधयोजना आणि देखरेखीसाठी काही सुधारणा केल्या आहेत. जिल्ह्याच्या ठिकाणी मुख्य क्षयरोग केंद्र असते, त्या खाली तालुकावार क्षयरोग उपकेंद्रे व बेडका तपासण्याच्या सोयी आहेत. औषधयोजना सुटसुटीत झाली असून औषधे उपकेंद्रात समक्ष घ्यायची आहेत. काही त्रास झाला तर त्याबद्दल योग्यती मदत/मार्गदर्शन करण्यासाठी उपकेंद्रावर सोय आहे.
यातली औषधयोजना ठरवण्याचे काम शासकीय आरोग्यकेंद्राचे डॉक्टर करतात. उपकेंद्रावर फक्त उपचार होतात. आवश्यक तर बेडक्याचा नमुना काचपट्टीवर घेतला जातो. सर्व गोळया प्लॅस्टिक पॅकमध्ये मिळतात. पहिले दोन महिने (गट व मध्ये तीन महिने) जास्त औषधे दिली जातात, त्यानंतर कमी, असे तत्त्व आहे. प्रत्येक रुग्णाचे पूर्ण खोके वेगळे ठेवले जाते. म्हणजे अपुरा औषधोपचार व्हायचे कारण नसते.
मुख्य उद्दिष्टे अशी :
– सर्वांनी नियमित व पूर्ण उपचार घ्यावेत.
– संसर्गाला आळा बसावा आणि रुग्ण लवकर बरा व्हावा.
– यासाठी दर दोन महिन्यांनी बेडक्याची पुनर्तपासणी केली जाते.
-औषधांचे काही त्रासदायक परिणामही होतात. अशा वेळी काय करायचे याची सूचना औषधे देणा-याला दिलेली असते.
महाराष्ट्रात समक्ष उपचार योजना सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांपर्यंत पोहोचलेली आहे. याशिवाय सर्व आशा कार्यकर्त्यांना क्षयरोगाची शंका घेऊन रुग्ण पाठवणीसाठी प्रशिक्षण दिलेले आहे. एका रुग्णाचे समक्ष उपचार पूर्ण करण्यासाठी आशा कार्यकर्त्यांना 500 रु. मानधन दिले जाते.