Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

लॉकडाऊनमध्ये फळे-भाजीपाल्याची विक्री

मी तानाजी विठ्ठल नलवडे, मिरज तालुक्यातील बेडग येथील शेतकरी. माझ्या सेंद्रीय शेतीमध्ये फळे व भाजीपाला याचे उत्पादन मी घेतो. त्याबरोबर इतरांनाही सेंद्रीय शेती कशी करावी याबाबत मार्गदर्शन करतो व माहिती देतो. सन 2020 मध्ये कोरोना विषाणूच्या संकटामुळं सर्वांचेच जीवनमान विस्कळीत झाले. कोरोनाच्या काळात शेतातील कामे सुरुच होती. शेतात आलेली फळं व भाजीपाला याचं काय करायचं हा प्रश्न पडला होता. टि.व्ही.वर लॉकडाऊनच्या बातम्या सतत सुरु होत्या. या बातम्या पाहताना शहरी भागामध्ये जीवनावश्यक वस्तू, दूध, फळे, भाजीपाला यांचा तुटवडा असल्याचं दाखविण्यात येत होते. तर काही ठिकाणी चढ्या दराने जीवनाश्यक वस्तूंची विक्री होत असल्याचे सांगितले जात होतं. अशा वेळी मानवतेच्या दृष्टीकोनातून शहरी भागामध्ये फळे व भाजीपाला पुरविण्याचा निर्णय घेतला. यासंदर्भात गावातील अधिकारी व कर्मचारी यांच्याशी संपर्क साधून माझी कल्पना त्यांना सांगितली.

 कोरोनाचा कहर जोरात सुरु होता. रुग्णांची संख्या वाढत होती या काळात घराच्याबाहेर पडणं म्हणजे मृत्यूला निमंत्रण देण्यासारखं होतं. पण मी डगमगलो नाही. प्रशासनाकडुन वाहतुकीची परवानगी मिळाली. लगेचच शहरातील काही परिचयाच्या लोकांशी संपर्क करुन थेट घरी फळे व भाजी आणून देण्याबाबत चर्चा करुन लगेचच पुरवठा सुरु केला. सुरक्षिततेचे सर्व नियम व अटी पाळून फळे आणि भाजीपाला विक्री सुरु ठेवली. यामुळं मला आत्मिक समाधान लाभलं. ज्या–ज्या लोकांना मी ना–नफा ना–तोटा या तत्वाचा अवलंब करुन फळे व भाजीपाला पुरवला ते सगळे माझे आभार मानत होते. एकच प्रार्थना करतो मानवावर अशी गंभीर परिस्थिती पुन्हा कधीही न येवो.

 – तानाजी विठ्ठल नलवडे, बेडग, ता.मिरज जि.सांगली

Exit mobile version