रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिनांक 2 सप्टेंबर 2020 च्या जीएसआर 594(ई) नुसार रस्ते अपघात दुर्घटनेनंतर मदत करणाऱ्या लोकांच्या संरक्षणासाठी नियम प्रकाशित केले आहेत. या नियमात, मदत करणाऱ्या व्यक्तींच्या हक्कांची तरतूद आहे ज्यानुसार संबंधित व्यक्तीला त्याच्या धर्म, राष्ट्रीयत्व, जाती किंवा लिंग यांच्या आधारावर कोणताही भेदभाव न करता सन्मानपूर्वक वागवले जाईल. कोणत्याही पोलिस अधिकारी किंवा इतर कोणत्याही व्यक्तीने त्या मदत करणाऱ्या व्यक्तीला त्याचे नाव, ओळख, पत्ता किंवा इतर कोणतीही वैयक्तिक माहिती उघड करण्यास भाग पाडू नये. तथापि, तो स्वेच्छेने ते उघड करू शकतो.
या नियमांनुसार प्रत्येक सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावर किंवा इतर स्पष्ट ठिकाणी, आणि त्यांच्या वेबसाइटवर हिंदी, इंग्रजी आणि स्थानिक भाषेत एक सनद (चार्टर) प्रकाशित करण्याची तरतूद आहे, ज्यायोगे कायद्यानुसार, मदत करणाऱ्या या लोकांचे हक्क आणि त्याद्वारे बनविलेले नियम नमूद केले जातील. तसेच एखाद्या व्यक्तीने ज्याने मदत म्हणून काम केले आहे, त्या प्रकरणात स्वेच्छेने साक्षीदार होण्याचे मान्य केले असेल तर, या नियमातील तरतुदींनुसार त्याची तपासणी केली जाईल, ज्यासाठी नियमात तपशीलवार मार्गदर्शक तत्त्वे आणि प्रक्रियेचा उल्लेख केला गेला आहे.
मोटार वाहन (दुरुस्ती) अधिनियम, 2019 मध्ये “मदत करणाऱ्या लोकांचे संरक्षण” यासंदर्भातील नवीन कलम 134 ए समाविष्ट केले गेले आहे. एखाद्या मोटार वाहन अपघातात पीडित व्यक्तीच्या दुखापतीसाठी किंवा मृत्यूसाठी त्या दुर्घटनेनंतर मदत करणारी व्यक्ती कोणत्याही दिवाणी किंवा फौजदारी कारवाईसाठी जबाबदार असणार नाही. आपत्कालीन वैद्यकीय किंवा बिगर वैद्यकीय सेवा किंवा सहाय्य देताना मदत करणाऱ्यांकडून काही दुर्लक्ष झाले आणि अपघातग्रस्त व्यक्ती जखमी झाला किंवा त्याचा मृत्यू झाला तर केंद्र सरकारच्या नियमांच्या आधारे मदत करणाऱ्या व्यक्तीची चौकशी केली जाऊ शकते, त्याची वैयक्तिक माहिती उघड केली जाऊ शकते.