Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

जल व मृद संधारणाच्या माध्यमातून कृषि विकासास चालना

रोहयो, मृद व जलसंधारणाची कार्यशाळा संपन्न

नंदुरबार (जिमाका वृत्तसेवा) दि. 18 : जल व मृदसंधारणाच्या कामांतून कृषी क्षेत्राचा विकास करता येणे शक्य आहे. त्याकरिता शेतकऱ्‍यांशी संवाद साधून कामकाजाची रूपरेषा ठरवावी व या कामांना चालना द्यावी, अशा सूचना रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव नंद कुमार यांनी दिल्या.

रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नंद कुमार यांच्या उपस्थितीत येथील जिल्हाधिकारी कार्यालयात ‘प्रत्येक शेताला पाणी’ आणि  महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनाबाबत कार्यशाळा संपन्न झाली, यावेळी ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे, सहायक जिल्हाधिकारी मीनल करनवाल, मैनक घोष, प्रादेशिक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे आदी उपस्थित होते.

श्री. नंदकुमार म्हणाले की, महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून विविध प्रकारची कामे घेता येतात. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी रोहयोतून जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात करावीत. तसेच उपलब्ध असलेल्या सिंचन क्षमतेवर उत्पन्नात जास्तीत जास्त वाढ होण्यासाठी नियोजन करावे. शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्याचा वापर काटकसरीने करावा. यासाठी अधिकचे क्षेत्र हे ठिबक सिंचनाखाली आणावे. त्यासाठी ठिबक सिंचनाचे फायदे शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवून याची माहिती द्यावी. प्रत्येक गाव समृद्ध करण्यासाठी गावातील प्रत्येक पात्र कुटूबांला रोहयोच्या माध्यमातून रोजगार मिळायला हवा. यासाठी गावपातळीवर नियोजन करावे. त्यासाठी अधिकाधिक शेतकऱ्यांशी संवाद साधावा. जलसंधारण व मृदसंधारणाच्या कामांतून कृषी विकास करता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने कामकाज करावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.

श्रीमती खत्री म्हणाल्या की, शेल्फवरील कामे त्वरित सुरू करण्यात यावेत. अधिकाऱ्यांनी जनतेशी थेट संवाद साधून ग्रामस्थांच्या आवश्यकतेनुसार कामे त्वरित सुरू करावी. रोहयोतून काम वेळेवर उपलब्ध होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये निर्माण करावा. आगामी काळात या योजनेची जिल्ह्यात अधिक प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गावडे म्हणाले की, जिल्ह्यात रोहयोची कामे खूप असून ही कामे एक चळवळ म्हणून करावीत.

चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी ‘रोहयो’च्या अंमलबजावणीबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे वरुन मार्गदर्शन करताना म्हणाल्या की, जिल्ह्यात स्थलांतराचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना जास्तीत जास्त रोजगार उपलब्ध करुन द्यावा. यासाठी त्यांचेशी स्थानिक भाषेतून संवाद साधुन रोजगाराविषयी माहिती द्यावी व स्थलांतर रोखण्यासाठी प्रवृत्त करावे, अशाही सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी अधीक्षक अभियंता श्री. काळे, सहाय्यक संचालक श्री. कलवले यांनी रोहयो व मृद संधारणातून करता येत असलेल्या कामांबाबत मार्गदर्शन केले.

उपजिल्हाधिकारी श्री. मोरे यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी राज्य प्रशिक्षण समन्वय निलेश घुगे, राज्य प्रकल्प अधिकारी (रोहयो) सायली घाणे, प्रविण सुतार तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी तांत्रिक सहायक, सहायक कार्यक्रम अधिकारी, डाटा एंन्ट्री ऑपरेटर आदि कार्यशाळेस उपस्थित होते.

 

Exit mobile version