रास्त भाव दुकानातील धान्याचा इष्टांक वाढवून देण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा सुरु

मुंबई, दि. 11 : राज्यातील रास्त भाव दुकानातून पुरविण्यात येणारा धान्याचा इष्टांक हा २०११ च्या लोकसंख्येच्या आधारे केंद्राने ठरवून दिला असून धान्याचा हा इष्टांक वाढवून देण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

नागपूर जिल्ह्यातील रेशन प्रणालीतील दोष दूर करुन पात्र लाभार्थ्यांना धान्य वितरित करण्याची मागणी सदस्य मोहन मते यांनी तारांकित प्रश्नाद्वारे विधानसभेत केली, त्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, सर्व लाभार्थ्यांना रास्त भाव दुकानांमधून धान्य उपलब्ध करुन दिले जात असून नागपूर शहर आणि ग्रामीण भागात ७ लाख ८१ हजार ७६० शिधापत्रिकाधारकांना रास्त भाव दुकानातील धान्याचा लाभ मिळतो. त्यातील ३ लाख ८० हजार ३४७ शिधापत्रिकाधारक हे अप्राधान्य गटातील असल्याने त्यांना कोविड काळात ४ महिने धान्य देण्यात आले, नंतर त्याचे वाटप बंद करण्यात आले. प्राधान्यक्रमाच्या गटातील सर्वांना धान्य देण्यात येत असल्याचेही मंत्री श्री. भुजबळ यांनी सांगितले. जिल्हा स्तरावर दक्षता समित्या स्थापन करण्यासंदर्भात सर्व पालकमंत्र्यांना सूचित करण्यात येईल, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

शिधावाटप दुकानांत कमी धान्य देण्याच्या ९ तक्रारी;  १३ दुकानदारांकडून ९१ हजारांचा दंड वसूल – अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ

मुंबई, दि. 11 : सोलापूर शहरातील शिधावाटप दुकानदारांकडून कमी धान्य देण्यासंदर्भात ९ तक्रारी प्राप्त झाल्या असून १३ दुकानदारांवर दंडात्मक कारवाई करुन त्यांच्याकडून ९१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे, असे अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षणमंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभेत सांगितले.

विधानसभा सदस्य विजयकुमार देशमुख यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला उत्तर देताना मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, सोलापूर शहरात ३१५ आणि सोलापूर ग्रामीण भागात १५५८ शिधावाटप दुकाने आहेत. सोलापूर शहरातील दुकानांमधून कमी धान्य देण्यासंदर्भात ९ तक्रारी प्राप्त झाल्या असून १३ दुकानदारांवर कारवाई करुन त्यांच्याकडून ९१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

धान्य मिळत नसल्याच्या ४८ तक्रारी प्राप्त झाल्या होत्या मात्र आणि प्राधान्य यादीतील कुटुंबांनाच फक्त धान्य दिले जात असल्याने आणि प्राप्त तक्रारी या अप्राधान्य यादीतील होत्या. सोलापूर तालुक्यात धान्य मिळत नसल्याच्या ६८८ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यातील ५९० अप्राधान्य यादीत असल्याने त्यांना धान्य मिळाले नाही तर ७५ शिधापत्रिकाधारकांची डाटा एन्ट्री करण्यात आली असून २३ शिधापत्रिकाधारक नियमित धान्य घेत नसल्याच्या तक्रारींमुळे धान्य मिळालेले नाही असे सांगून सर्व्हरमध्ये समस्या उद्भवल्याने ई-पॉस मशीन्स बंद पडले होते असे मंत्री श्री. भुजबळ यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.