Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

नाफेडने आणले भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले राईस ब्रान तेल

केंद्रीय अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाचे सचिव सुधांशू पांडे यांनी आज “नाफेड फोर्टिफाइड राइस ब्रान ऑईल” चे  ई-उद्‌घाटन केले. या प्रसंगी सुधांशू पांडे म्हणाले की, नाफेडच्या पुढाकाराने भविष्यात आयात खाद्यतेलाच्या वापरावरील देशाचे अवलंबित्व लक्षणीय प्रमाणात कमी होईल.यामुळे भारतीय खाद्यतेल उत्पादकांना यापुढे संधी उपलब्ध होतील आणि पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर भारत उपक्रमालाही गती मिळेल, असेही ते म्हणाले. या भाताच्या कोंड्यापासून  बनवलेल्या  अधिक जीवनसत्व युक्त तेलाचे विपणन नाफेडच्या  (भारतीय राष्ट्रीय कृषी सहकारी विपणन महामंडळ मर्यादित ) माध्यमातून होणार आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरण (एफएसएसएएआय) चे मुख्य कार्यकारी अधिकारी अरुण सिंघल, नाफेड चे व्यवस्थापकीय संचालक संजीव कुमार चड्ढा आणि भारतीय खाद्य महामंडळ (एफसीआय) चे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आतिश चंद्र या ई-उद्‌घाटन कार्यक्रमाला उपस्थित होते.

अलीकडेच नाफेड आणि एफसीआय म्हणजेच भारतीय खाद्य महामंडळा दरम्यान भेसळविरहित  तांदुळाचे  उत्पादन आणि  विपणनासाठी सामंजस्य करार झाल्यासंदर्भात यावेळी भारतीय खाद्य महामंडळाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी  माहिती दिली.

भाताच्या कोंड्यापासून तयार केलेल्या  तेलामध्ये कोलेस्टेरॉलची पातळी कमी करण्यासह अनेक आरोग्यदायी फायदे आहेत आणि हे तेल आरोग्यवर्धक म्हणून कार्य करते आणि  कर्करोगाचा धोका कमी करते    हे लक्षात घ्यायला हवे . नाफेडचे भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले हे  तेल पोषक असणार आहे आणि यात अतिरिक्त पौष्टिक तत्वे आणि जीवनसत्त्वे असतील, हे सुनिश्चित करण्यात आले आहे.

भारतीय खाद्य सुरक्षा आणि मानके प्राधिकरणच्या म्हणण्यानुसार , भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले  शुद्ध तेल ‘अ’ आणि ‘ड’  जीवनसत्वांसाठी आवश्यक आहारातील 25-30% तत्वांची पूर्तता करते.   नाफेडचे भाताच्या कोंड्यापासून तयार केलेले शुद्ध तेल (फोर्टिफाइड राईस ब्रान ऑईल)  सर्व नाफेड स्टोअरमध्ये आणि विविध ऑनलाइन मंचावर  उपलब्ध असेल.

Exit mobile version