Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

‘प्रत्येक शेताला पाणी’ योजनेचा आढावा

धुळेदि. 17 : रोहयो, मृद व जलसंधारण विभागाचे अपर मुख्य सचिव श्री. नंदकुमार यांनी आज दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयातील नवीन नियोजन सभागृहात ‘हर खेत मे पानी’ (प्रत्येक शेताला पाणी) आणि त्यामध्ये मग्रारोहयोची उपयोगिता याबाबत आढावा घेत सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी जिल्हाधिकारी जलज शर्मा, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., उपवनसंरक्षक एम. एम. भोसले, नाशिक येथील प्रादेशिक जलसंधारण विभागाचे अधीक्षक अभियंता राजेंद्र काळे, मंत्रालयातील रोहयो विभागाचे सहाय्यक संचालक विजयकुमार कलवले, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज (रोहयो) आदी उपस्थित होते.

श्री. नंदकुमार यांनी सांगितले, की प्रत्येक पिकासाठी पाण्याची नव्हे, तर ओलाव्याची आवश्यकता असते. शास्त्रोक्त पद्धतीने पाणी उपलब्ध झाल्यास पिकांचे उत्पादन वाढते. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शेतीला पाणी उपलब्ध होण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सूक्ष्म नियोजन करण्याची गरज आहे. त्याबरोबरच शेतकऱ्यांशी अधिकाधिक संवाद साधण्याची आवश्यकता आहे. जलसंधारण व मृदसंधारणाच्या कामांतून कृषी विकास करता येणे शक्य आहे. त्यादृष्टीने कामकाज करावे. याबरोबरच रोजगार हमी योजनेतून विविध कामे घेण्यात येतात. त्याचेही नियोजन करावे, असेही त्यांनी सांगितले.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. शर्मा यांनी सांगितले, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नवनवीन तंत्रज्ञान समजून घेत ‘रोहयो’विषयी सकारात्मक दृष्टिकोना ठेवावा. तसेच आगामी काळात या योजनेची जिल्ह्यात प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येईल, असे सांगितले. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वान्मथी सी., श्री. भोसले, अधीक्षक अभियंता श्री. काळे, सहाय्यक संचालक श्री. कलवले यांनी मार्गदर्शन केले. यावेळी चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिताली सेठी यांनी ‘रोहयो’च्या अंमलबजावणीबाबत ऑनलाइन मार्गदर्शन केले. उपजिल्हाधिकारी श्री. दाणेज यांनी प्रास्ताविक, सूत्रसंचालन करून आभार मानले. यावेळी जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ए. आर. तडवी (ग्रामपंचायत) यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version