वाशिम जिल्ह्यातील नुकसानीच्या पंचनामेविषयक कार्यवाहीचा आढावा
पंचनामे तातडीने पूर्ण करून प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना
वाशिम, : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे काळजीपूर्वक करावेत. नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेती, पिकांचे पंचनामे करतांना प्रत्येक नुकसानीचा समावेश पंचनाम्यात करावा. यामधून एकही नुकसानग्रस्त शेतकरी सुटणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यात अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीच्या पंचनाम्यांची सद्यस्थिती, तसेच कोरोना सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित सभेत ते बोलत होते.
यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, जिल्हा पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सुनील कळमकर, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. विनोद वानखेडे, जिल्हा कृषि विकास अधिकारी विकास बंडगर, लघुसिंचन विभागाचे श्री. मापारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या प्रत्येक नुकसानीचे पंचनामे अचूकपणे होणे आवश्यक आहे. यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी अधिक लक्षपूर्वक काम करावे. नुकसानग्रस्त शेतकरी उपस्थित नसला तरीही त्याच्या शेतपिकांच्या नुकसानीचे अचूक पंचनामे करावेत. यामध्ये जमीन खरडून जाणे, पिकांचे नुकसान यासारख्या प्रत्येक नुकसानीची नोंद घ्यावी. पंचनाम्यातील त्रुटीमुळे किंवा नुकसानीचा उल्लेख पंचनाम्यात नसल्याने संबंधित शेतकरी मदतीपासून वंचित राहणार नाही, याची दक्षता घ्यावी. हे पंचनामे तातडीने पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल सादर करावा. तसेच घरांची पडझड, जनावरांचा मृत्यू आदी बाबींचे पंचनामे करून त्याबाबतचा प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तातडीने पाठवावेत, अशा सूचना पालकमंत्र्यांनी यावेळी दिल्या.
पाऊस व पुरामुळे जिल्ह्यातील काही रस्त्यांचे नुकसान झाले आहे. सदर रस्ते दुरुस्तीची कार्यवाही संबंधित विभागाने तातडीने सुरु करावी. तसेच विजेचे खांब पडल्यामुळे अथवा इतर कारणांनी काही ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे महावितरणने वीज पुरवठा पूर्ववत करण्याचे काम युद्धपातळीवर करावे, असे पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले.
कोरोना लसीकरण मोहिमेला गती देणे आवश्यक
कोरोना विषाणू संसर्गाची संभाव्य तिसरी लाट रोखण्यासाठी जिल्ह्यात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान करावी. ज्या गावांमध्ये, तालुक्यांमध्ये लसीकरणाचे प्रमाण कमी आहे, अशा भागांवर अधिक लक्ष केंद्रित करून लसीकरण वाढवावे. या भागांमध्ये जनजागृती करून लोकांना लसीकरणाचे महत्त्व पटवून देण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी यावेळी केल्या.
जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस. म्हणाले, २१ ते २३ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे मानोरा व मंगरूळपीर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे नजर अंदाज पाहणीवरून दिसून येते. प्राथमिक अंदाजानुसार सुमारे ३५०० हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान झाले असून पंचनामे गतीने सुरु आहेत. तत्पूर्वी झालेल्या पावसानेही जिल्ह्यात काही ठिकाणी नुकसान झाले आहे. वीज पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरणमार्फत कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. तसेच नुकसानग्रस्त घरांचे पंचनामे करून त्याबाबतचा अहवाल पाठविण्यात आला आहे.
जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग नियंत्रणात असून दैनंदिन सरासरी १ हजारपेक्षा अधिक चाचण्या करण्यात येत असून ३ ते ४ बाधित आढळून येत आहेत. लसीकरण वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात असून आतापर्यंत सुमारे ३५ टक्के लोकांनी लसीचा पहिला डोस, तर सुमारे ११ टक्के लोकांनी दुसरा डोस घेतला आहे. ज्या भागात लसीकरण कमी आहे, अशा भागात लोकांना घरोघरी जावून लसीकरणाबाबत माहिती देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.