महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या कामकाजासंदर्भात आढावा बैठक
मुंबई दि. २०: महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्या कामकाजाचा आढावा सहकार व पणन मंत्री बाळासाहेब पाटील यांनी घेतला.
यावेळी आमदार तथा मार्केटिंग फेडरेशनचे प्राधिकृत अधिकारी बाबासाहेब पाटील, व्यवस्थापकिय संचालक सुधाकर तेलंग व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
सहकार मंत्री श्री.पाटील म्हणाले, राज्यात कोविड-१९ मुळे विविध क्षेत्रात अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. यावर सर्व उपाययोजना आणि योग्य नियोजन करुन महाराष्ट्र राज्य सहकारी पणन महासंघाच्यावतीने हंगाम २०२०-२१ मध्ये किमान आधारभूत दराने मोठ्या प्रमाणत चना, तूर, मूग, उडीद, सोयाबीनची खरेदी करण्यात आली आहे. ही कामगिरी कौतुकास्पद असून शेतकरी हितासाठी शासन सर्वतोपरी सहकार्य करेल असेही श्री. पाटील यांनी यावेळी सांगितले.
मार्केटिंग फेडरेशन शेतकरी हितासाठी उद्दिष्टे समोर ठेवून कामे करत आहे. सभासद, सहकारी संस्थाचे बळकटीकरण, शेतकऱ्यांना रास्त दराने कृषी निविष्ठांचा पुरवठा करणे, नाफेड व भारतीय खाद्य महामंडळाच्यावतीने राज्यात खरेदीचे कामकाज करणे, शेतमाल व कृषी निविष्ठा साठवणुकीसाठी गोदाम उपलब्ध करणे, विविध योजना राबविण्यासंदर्भात आढावा बैठक घेण्यात आली. आमदार तथा मार्केटिंग फेडरेशनचे प्राधिकृत अधिकारी बाबासाहेब पाटील यांनी आभार मानले.