Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

महाराष्ट्रात निर्बंध १५ एप्रिलपर्यंत राहणार

मुंबई, दि. २७ :- राज्यामध्ये कोरोनाचा उद्रेक होत असल्याने लागू निर्बंध मर्यादा १५ एप्रिलपर्यंत वाढविण्यात येत असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.

राज्यात १५ एप्रिलपर्यंत अगोदर लागू केलेले सर्व निर्बंध पाळावे लागतील. त्याचप्रमाणे मास्क लावणे, सोशल डिस्टन्स ठेवणे, आदी सर्व आदेश पाळावे लागतील. कार्यालयात यापूर्वी लागू केलेले सर्व निर्बंधांसह काम करण्याची मुभा असेल. कंटेनमेंट झोन घोषित करण्यासाठी स्थानिक प्रशासन निर्णय घेतील. पाच पेक्षा जास्त लोकांसाठी रात्री आठ ते सकाळी सात पर्यंत जमावबंदी आदेश २७ मार्च २०२१ पासून लागू करण्यात आलेला असून १५ एप्रिल पर्यंत अंमलात असेल. याचे उल्लंघन करणाऱ्यांना एक हजार रुपये दंड भरावा लागेल.

इतर निर्बंधांमध्ये सार्वजनिक उद्याने व सागरी किनारे रात्री आठपासून सकाळी सात पर्यंत बंद असतील. सामाजिक, सांस्कृतिक, राजकिय आणि धार्मिक कार्यक्रमांना १५ एप्रिलपर्यंत परवानगी नसेल. त्याचप्रमाणे अशा जमावासाठी सभागृह तथा कक्षांचा वापर करण्यावरही निर्बंध असेल. लग्नकार्यात कमाल ५० लोक तर अंतिम संस्कारासाठी २० लोकांना हजर राहण्याची अगोदर दिलेली परवानगी १५ एप्रिलपर्यंत लागू असेल.

सर्व खाजगी कार्यालय आरोग्याशी संबंधित सर्व नियमांचे पालन करून 50 टक्के उपस्थितीतीसह काम करतील. अशा ठिकाणी मास्क न घालणाऱ्यांना प्रवेश देण्यात येणार नाही. तर शरीराचे तापमान मोजण्यासाठी थर्मामीटर आणि सार्वजनिक वापरासाठी सॅनीटायझरची व्यवस्था करावी लागेल.

सर्व एक पडदा व मल्टीप्लेक्समधील चित्रपटगृहे, मॉल्स, सभागृहे, उपाहारगृहे रात्री 8 ते सकाळी 7 वा. पर्यंत बंद राहतील. मात्र या वेळात टेक होम डिलिव्हरी सुरु राहील. याचा कुणी भंग केल्यास सबंधित चित्रपटगृह, मॉल, उपाहारगृह, हॉटेल हे कोविड -19 ची साथ असे पर्यंत बंद करण्यात येईल. सबंधित आस्थापनेला दंडही ठोठावण्यात येईल.

Exit mobile version