मुंबई, दि. २ :- ज्येष्ठ काँग्रेस नेते, माजी खासदार, माजी आमदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या निधनानं ग्रामीण विकासाचा ध्यास असलेलं, सर्वसामान्य जनतेशी नाळ जुळलेलं, शेती, सहकाराच्या क्षेत्रातलं तज्ज्ञ, मार्गदर्शक नेतृत्वं काळाच्या पडद्याआड गेलं आहे. त्यांचं निधन ही राज्याच्या सहकार क्षेत्राची मोठी हानी आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्धांजली वाहिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार शोकसंदेशात म्हणतात की, दहेगावच्या सरपंचपदापासून खासदारकीपर्यंतचा रामकृष्ण बाबा पाटील साहेबांचा प्रवास हा अपार कष्ट, जनसेवेच्या तळमळीचा प्रवास आहे. शेती व सहकाराच्या माध्यमातून त्यांनी ग्रामीणविकासावर भर दिला. शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी त्यांनी काम केलं. त्यांचं जीवन राजकीय, सामाजिक, कार्यकर्त्यांसाठी प्रेरणादायी, मार्गदर्शक आहे.
गावच्या सरपंचपदापासून ते खासदार होण्यापर्यंत असा राजकीय प्रवास असलेले काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील (वय ९१)यांचे अल्पशः आजाराने निधन झालं. अगोदरच मधुमेह आणि त्यात कावीळ झाल्याने त्यांच्यावर सुरुवातीला पुणे येथील रुबी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते;मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता त्यांना औरंगाबाद येथील सिटीकेअर रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान आज सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
रामकृष्ण बाबा यांनी सरपंच, विविध कार्यकारी सहकारी संस्थेचे अध्यक्ष, राज्य सहकारी बँकेचे संचालक, पंचायत समिती सभापती आणि खासदार अशी विविध पदे भूषवलेली अशी त्यांची राजकीय कारकीर्द होती. तसेच आपल्या पदावर असताना त्यांनी अनेक विकासकामांना प्राधान्य दिले. १९८७ साली तालुक्यातील जवळपास २२ गावांसाठी गोदावरी उपसा जलसिंचन ही महत्त्वाकांक्षी योजना कार्यान्वित करून तालुक्यारतील 18 हजार एकर जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर गेल्या वर्षी भाजप सरकारच्या वतीने ही योजना पुन्हा कार्यान्वित करून या योजनेला सहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करण्यात आला.
जिल्ह्यातील अत्यंत जुने आणि ज्येष्ठ काँग्रेस कार्यकर्ते त्याचबरोबर धुरंदर राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. आपली पूर्ण राजकीय कार्यकर्त्यांनी काँग्रेस पक्षातच घालून एकनिष्ठ राहिले. त्यामुळे काँग्रेस तसेच इतर राजकीय पक्षातून पक्ष प्रवेश करणा-या कार्यकर्त्यांसाठी ते एक आदर्श होते. विशेष म्हणजे रामकृष्णबाबा पाटील यांचा आज 91 वा वाढदिवस होता. त्यांच्या पश्चात मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ संचालक आप्पासाहेब पाटील, कृषी बाजार समितीचे माजी सभापती काकासाहेब पाटील हे दोन मुलांसह दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे