कोरोनाचा संसर्ग झाल्याने राजू शेट्टी रुग्णालयात

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याने त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. राजू शेट्टी यांनी कोरोना चाचणी केल्यानंतर त्याचा अहवाल पॉसिटीव्ह आला आहे. त्यानंतर त्यांची प्रकृतीही बिघडू लागली. यासाठी त्यांना पुण्यातील दिनानाथ मंगशेकर रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

राजू शेट्टी यांनी सोशल मिडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पहिले काही दिवस राजू शेट्टी यांच्यावर घरीच उपचार सुरु होते. चांगल्या वैद्यकीय उपचांरासाठी त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. सध्या डॉक्टरांच्या देखरेखीखाली राजू शेट्टी यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरु आहेत. राजू शेट्टी यांची पत्नी तसंच मुलगा सौरभ यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांचा अहवाल देखील पॉसिटीव्ह आला आहे. राजू शेट्टी यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

राजू शेट्टी यांनी मागील महिन्यात राज्यभर दौरा, आंदोलन केले होते. यादरम्यान त्यांना करोनाची बाधा झाली. त्यांचा अहवाल पाच दिवसापूर्वी सकारात्मक आला. ते घरीच अलगीकरण होऊन वैद्यकीय उपचार घेत होते. काल रात्री त्यांच्या रक्तामध्ये दोष आढळल्याने जयसिंगपूर येथील डॉ. सतीश पाटील यांच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना प्राणवायूचा पुरवठा करण्यात आला होता. तर, पुढील वैद्यकीय उपचार चांगल्या पद्धतीने व्हावेत यासाठी त्यांना आज पुणे येथे हलवण्यात आले. प्राणवायू पुरवठा असलेल्या रुग्णवाहिकेतून त्यांना मंगेशकर रुग्णालयात दाखल केले आहेत. येथे त्यांच्यावर ते करोनामुक्त होईपर्यंत उपचार केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.