राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची ६ मे रोजी १०० वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने हे वर्ष ‘कृतज्ञता पर्व’ म्हणून साजरे करण्यात येणार असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व संपूर्ण राज्यात साजरे करणार येणार आहे. राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी घेण्यात येणाऱ्या या उपक्रमात जिल्ह्यातील सर्व संस्था, संघटना व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन पालकमंत्री सतेज पाटील यांनी केले.

राजाराम महाविद्यालयाच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात लोकराजा राजर्षी शाहू महाराज स्मृती शताब्दी पर्व आयोजनाबाबत बैठक व पत्रकार परिषद झाली, यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी ही माहिती दिली. बैठकीस व पत्रकार परिषदेस ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, खासदार संभाजीराजे छत्रपती, जयंत आजगावकर, आमदार पी.एन. पाटील, राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजसिंह चव्हाण, इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार व रमेश जाधव उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्व वर्षभर साजरे करण्यात येणार असून या पर्वात अनेक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. उपक्रमात नवीन कार्यक्रम राबविण्यात मान्यवर व जनतेकडून आलेल्या नवीन सूचनांचा स्वीकार केला जाईल, असे ते म्हणाले. राज्यात छत्रपती शाहू महाराजांनी ज्या-ज्या ठिकाणी भेटी दिल्या आहेत अशा ठिकाणीही कार्यक्रम राबविण्यात येतील. यातील काही कार्यक्रम सांस्कृतिक विभागाकडे दिले जातील.  शाहू मिल व परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्मृती- शताब्दी पर्वातील काही कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात येतील असे सांगून पालकमंत्री म्हणाले, शाहू मिल स्मृती स्थळ म्हणून विकसित केले जाईल असे ते म्हणाले.

ग्रामविकास मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, राजर्षी शाहू महाराज हे समतेचा संदेश देणारा जगातील एकमेव राजा, पुरोगामी विचारांचा जागर करणारे राजा असून राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात लोकराजा शाहू महाराजांच्या कार्याला उजाळा देण्यात येणार आहे.  स्मृती-शताब्दी पर्वात राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा गुणगौरव केला जाणार आहे. या कार्यक्रमाचे निमंत्रण राष्ट्रपती महोदयांना देऊन हा कार्यक्रम राष्ट्रीय स्तरावर साजरा करण्यात येईल.

खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी राजर्षी शाहू महाराज स्मृती-शताब्दी पर्वात राज्यातील नामवंत शेतकऱ्यांसाठी ॲग्रीकल्चर कार्यशाळा घेण्यात यावी. दिल्लीतही कार्यक्रम व्हावा, शाहू महारांजानी भेट दिलेल्या ठिकाणी कार्यक्रम व्हावेत, कोल्हापूरला जागतिक स्तरावर पोहोचवावे, शाहू मिल काम आणि शाहू महाराजांनी उभारलेल्या वास्तूंचे संरक्षण, शाहू चरित्रग्रंथ अभ्यासक्रमात समावेश, खासबाग मैदावार महाराष्ट्र केसरी व हिंद केसरी स्पर्धाचे आयोजन व्हावे अशी अपेक्षा व्यक्त केली.

यावेळी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज स्मृती-शताब्दी कृतज्ञता पर्व लोगोचे मान्यवरांच्या हस्ते अनावरण करण्यात आले.

१८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत विविध उपक्रम

राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी निमित्ताने शासन आणि लोक सहभागातून लोकराजा ‘शाहू कृतज्ञता पर्व’ आयोजित करण्यात येत आहे. या निमित्ताने १८ एप्रिल ते २२ मे या कालावधीत विविध उपक्रम आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांच्या शंभराव्या स्मृती शताब्दी दिनी (६ मे रोजी) लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना कोल्हापूरची जनतेकडून आदरांजली वाहण्यात येईल.

राज्यभरात विविध उपक्रम

या ‘कृतज्ञता पर्व’ दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यभरात विविध उपक्रम आयोजित केले जाणार आहेत. पोवाडा, संगीत, मर्दानी खेळ, चित्ररथ, व्याख्याने, प्रदर्शन, असे व इतर विविध उपक्रम राज्यभर आयोजित करुन राजर्षी शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त केली जाईल.

रथोत्सव

राजर्षी शाहू महाराजांनी जोतिबा यात्रेनंतर छत्रपती ताराराणी व छत्रपती शिवाजी महाराजांच्या रथोत्सवाची सुरुवात केली होती. याच दिवशी या उपक्रमाला सुरुवात करून सर्व वारसास्थळे आणि इतर वास्तूंची स्वच्छता मोहीम, नाम फलकांचे अनावरण करण्यात येणार आहे.

एकाच वेळी शंभर ठिकाणी शंभर वक्त्यांचे व्याख्यान

दिनांक ५ मे रोजी जिल्ह्यात व जिल्ह्याबाहेर राजर्षी शाहू महाराजांच्या कार्याचा, विचारांचा, दृष्टीकोनाचा परिचय करुन देण्यासाठी एकाच वेळी शंभर ठिकाणी शंभर वक्त्यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात येत आहे. या व्याख्यानातून राजर्षी शाहू महाराजांच्या कार्य कर्तृत्वाची माहिती देऊन त्यांच्या विचारांचा वारसा जोपासला जाईल.

आदरांजली कार्यक्रम

दिनांक ६ मे रोजी जिल्ह्यात सर्वच ठिकाणी राजर्षी शाहू महाराजांना आदरांजली वाहण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.

कृतज्ञता फेरी

शहरात सकाळी शाहू जन्मस्थळ, नवा राजवाडा, रेल्वे स्टेशन, शाहू मिल, साठमारी, कुस्ती मैदान, बावडेकर आखाडा, गंगावेस तालीम, शिवसागर, रजपूतवाडी व भवानी मंडप येथून कृतज्ञता फेरी काढण्यात येवून ही फेरी शाहू समाधी स्थळ येथे पोहोचेल.

शंभर सेकंद श्रद्धांजली

शाहू जन्मस्थळ येथे पुष्पांजली वाहिल्यानंतर शंभर सेकंद सर्व शहर श्रद्धांजली वाहण्यासाठी स्तब्ध राहील. या शंभर सेकंद काळात नागरिक जेथे असतील तेथे स्तब्ध थांबून श्रद्धांजली वाहतील.

विविध उपक्रमांचे आयोजन

कृतज्ञता पर्वामध्ये छत्रपती शाहू महाराजांच्या कार्याचा आढावा, आदेश व छायाचित्रांचे प्रदर्शन आयोजित केले जाणार आहे. दर तीन महिन्यांनी मान्यवरांचे व्याख्यान आयोजित केले जाणार आहे.

या उपक्रमा दरम्यान राजर्षी शाहू महाराजांनी आश्रय दिलेल्या मल्लांच्या कुटुंबियांचा स्नेह मेळावा, सामुदायिक आंतरजातीय विवाह, आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिषद अशा विविध उपक्रमांचे आयोजन केले जाणार आहे.

दिनांक १ मे ते ५ मे दरम्यान कोल्हापूर ते खेतवाडी, मुंबई अशा समता रॅलीचे आयोजन करण्यात आले असून राज्यात व्याख्याने आयोजित केली जाणार आहेत.

सिटी बझार संकल्पना

गुजरी मध्ये कोल्हापुरी दागिने,

चप्पल लाईन मध्ये कोल्हापुरी चपला,

कुंभार गल्लीत मातीच्या वस्तू,

बुरुड गल्लीत बांबू पासून तयार करण्यात आलेल्या वस्तू,

लक्ष्मीपूरी मध्ये मिरची मसाला,

मार्केट यार्ड मध्ये गूळ आणि तांदूळ,

कोल्हापुरी पदार्थांचा खाद्य महोत्सव,

कॉटन कापड अशी महाराजांनी प्रोत्साहन दिलेल्या व्यावसायिकांकडून कृतज्ञतेने पर्यटक व स्थानिक लोकांना दर्जेदार व योग्य किंमतीमध्ये उपलब्ध करुन देवून आदरांजली वाहिली जाईल.

विविध स्पर्धा

विद्यार्थ्यांसाठी चित्र, निबंध, प्रश्नमंजुषा स्पर्धा, कुस्ती स्पर्धा, वक्तृत्व, किल्ला निर्मिती प्रमाणेच शाहू कालीन वास्तूची प्रतिकृती निर्मिती आदी विविध स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहेत.

विविध कलांचे सादरीकरण

याचबरोबर शंभर चित्रकार एकाच ठिकाणी एकाच वेळी आपली कला सादर करतील. तर नाटक, शाहिरी, संगीत नाटक, मर्दानी खेळ, कुस्ती मैदान आदी कार्यक्रम आयोजित करून कलेला राजाश्रय देणाऱ्या राजा प्रती कृतज्ञता व्यक्त करतील.

उद्योग, व्यवसाय सुरु करण्यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी प्रोत्साहन दिले होते. यासाठी कृतज्ञतापूर्वक स्टार्ट अप समिट आयोजित होईल.

या सर्व उपक्रमांच्या नियोजनाची जबाबदारी ही विविध संस्था, संघटना, मंडळे यांनी उत्स्फूर्तपणे स्वीकारुन लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांप्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन उपस्थित सर्व मान्यवरांनी केले.