नाशिक परिसरात जोरधार; गोदावरीतून जायकवाडीकडे झेपावले पाणी

नाशिक, ता. 22 : नाशिक, त्र्यंबकेश्वर आणि परिसरात मागील दोन दिवसांपासून जोरदार पाऊस पडत असून आज दिनांक 22 सप्टेंबर रोजी नाशिक शहरासह गंगापूर आणि काश्यपी धरणांच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने धरणांची पातळी वाढली आहे. शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा गंगापूर धरण 99 टक्के भरल्याने दुपारपासून सुमारे 6 हजार क्युसेक्सने तर सायंकाळी 8 हजार क्युसेक्स दराने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. नांदूर मध्यमेश्वर आणि दारणा नदीतूनही पाण्याचा विसर्ग होत असून हे पाणी जायकवाडीकडे झेपावणार आहे. त्यामुळे औरंगाबादसह मराठवाड्याला काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

मागील वर्षी 1 जून ते 22 सप्टेंबर 2020 या कालावधीत नाशिक जिल्ह्यात 1045 मि.मी. सरासरी पाऊस पडला, तर यंदाच्या वर्षी याच कालावधीत 911 टक्के म्हणजेच सरासरीच्या 91 टक्के पाऊस पडला आहे. परतीच्या पावसाला अजून अवकाश असल्याने येणाºया काळात पाऊसमान पडून ही सरासरी भरून निघेल असा अंदाज आहे. त्याचा फायदा जायकवाडीसारख्या धरणांना होणार आहे.

नाशिकमध्ये गोदावरीला पूर

यंदा गोदावरीला दुसºयांना पूर आला असून दुपारपर्यंत नाशिकच्या गोदाकाठावर रामसेतू पूलाला पाणी लागले होते. काठावरील व्यापाºयांची पूरामुळे चांगलीच धांदल उडाली. नाशिक शहरातील होळकर पूलाखालील बंधाºयातूनही पाणी सोडण्यात आल्याने पूराच्या पातळीत वाढ झाल्याचे चित्र होते. दरम्यान नाशिक जिल्ह्यातील नांदगाव आणि मनमाड परिसरातही जोरदार पाऊस पडल्याने येथील नदी-नाल्यांना पूर आला आहे. नांदगावला रेल्वेपूलाखालील रस्ता पुरामुळे बंद झाल्याने शहर दोन भागात विभागले गेले आहे. या पावसाने अनेक भागांना दिलासा मिळणार आहे, मात्र नाशिकमधील देवळा तालुक्यातील काही भागात अजूनही पावसाची प्रतिक्षा असून नंदुरबार जिल्ह्यातही म्हणावा तसा पाऊस पडलेला नाही.

दरम्यान पुढील दोन दिवस मध्य महाराष्टÑ, कोकण, मराठवाडा, विदर्भात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे, तर पुणे वेधशाळेने संपूर्ण आठवडाभर राज्यात पाऊस सक्रिय राहणार असल्याचा अंदाज वर्तविला आहे.