नाशिक दि. २१ : काल आणि आज राज्यातील विविध भागात मुसळधार पाऊस पडला. त्यामुळे अनेक नद्यांना पूर येऊन पाणी पातळी वाढली आहे. तर काही ठिकाणी ढगफुटीसदृश पाऊस झाला आहे. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथे आज ढगफुटी सदृश पाऊस पडला. दरम्यान कालपासून देशातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडला असून महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात मध्ये पुढील काही दिवस मॉन्सून सक्रीय राहण्याची शक्यता स्कायमेट ने वर्तविली आहे. तर दिनांक २२ सप्टेंबरपर्यंत राज्यात काही ठिकाणी विजांच्या गडगडाटासहीत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाचा पट्टा आणि त्यामुळे बदललेले हवामान याचा एकत्रित परिणाम विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि कोकणावर राहील, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तविला आहे.
दरम्यान यंदा राज्यात उशिरा सुरु झालेल्या पावसाने सरासरी गाठली आहे. मात्र १५ राज्यातील अनेक भागात पावसाने सरासरी पार केलेली नाही. पुणे वेध शाळेने वर्तविलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस राज्यात पावसाचे असणार आहेत. दिनांक २३ पर्यंत अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.