Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

खाद्यतेलात भेसळ करणाऱ्या कारखान्यांवर छापा

मुंबई, दि. 17 : गोपनीय माहितीच्या आधारे दि. 15 मार्च 2021 रोजी सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांनी त्यांच्या पथकासह ओमकार ट्रेडिंग कंपनी व मे.शिवय ट्रेडिंग कंपनी, सातिवली, वसई (पू.) या दोन खाद्यतेल रिपॅकींग करणाऱ्या आस्थापनांवर छापा टाकला यामध्ये 32 लाखापेक्षा जास्त किंमतीचा विविध खाद्यतेलाचा साठा जप्त करण्यात आला आहे.

या ठिकाणी खाद्यतेलांमध्ये भेसळ होत असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. तसेच खाद्यतेलाच्या रिपॅकींगसाठी जुन्या टीनचा पुनर्वापर होत असल्याचे दिसून आले. खाद्यतेलाच्या काही पाऊचमध्ये पाकिटावर नमूद केलेल्या वजनापेक्षा कमी वजनाचे खाद्यतेल भरले असल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले. या दोन्ही आस्थापनांमधून सुमारे ३२ लाख ५० हजार ५६८ रुपये किंमतीचा विविध खाद्यतेलांचा साठा जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी विश्लेषणासाठी  घेण्यात आलेल्या खाद्यतेलांचे नमुने प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून त्यांचे अहवाल प्राप्त होताच दोषींविरुद्ध कारवाई करण्यात येईल.

ही कारवाई अन्न व औषध प्रशासन मंत्री डॉ.राजेंद्र शिंगणे, राज्यमंत्री राजेंद्र यड्रावकर व आयुक्त अभिमन्यू काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांच्या नियंत्रणाखाली अन्न सुरक्षा अधिकारी एम.आर.घोसलवाड, एम.आर.महांगडे, नि.सो.विशे, डी.एस.महाले, वाय.एच. ढाणे, डी.एस.साळुंखे, पी.पी.सूर्यवंशी, बी.एन.चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली. अन्न पदार्थ वा औषधे यांच्या गैरप्रकाराबाबत कोणतीही माहिती अथवा तक्रार असल्यास ती टोल फ्री क्र.१८००२२२३६५ वर अन्न व औषध प्रशासनाला देण्याचे आवाहन सह आयुक्त (दक्षता) समाधान पवार यांनी जनतेला केले आहे.

Exit mobile version