Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

पुणे व औरंगाबाद हाय स्पीड रेल्वेने जोडण्याबाबत काय म्हणाले मुख्यमंत्री…

मुंबई ते हैद्राबाद, पुणे ते औरंगाबाद हाय स्पीड रेल्वे मार्गाबाबत मुख्यमंत्र्यांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई :  मुंबई –नाशिक- नागपूर हाय स्पीड रेल्वेच्या कामाला गती देताना राज्य सरकार पूर्ण सहकार्य करेल मात्र याच जोडीने जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद तसेच पुणे ते औरंगाबाद (Pune to Aurangabad Railway ) देखील हाय स्पीड रेल्वेने जोडावेत अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

मुख्यमंत्री आपल्या पत्रात म्हणतात की, प्रस्तावित मुंबई ते नागपूर हाय स्पीड रेल्वे मार्ग जालन्यापर्यंत हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या जोडीनेच जात आहे. राज्य शासनाने जालना ते नांदेड दरम्यान द्रूतगती महामार्ग सुरु करण्याचे टाकण्याचे ठरविले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने यापूर्वीच नांदेड ते हैद्राबाद ही शहरे द्रूतगती महामार्गाने जोडण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जालना आणि नांदेड मार्गे मुंबई ते हैद्राबाद हा हाय स्पीड रेल्वे मार्ग संयुक्तिक ठरेल.

याशिवाय पुणे आणि औरंगाबाद ही शहरे देखील हाय स्पीड रेल्वे मार्गाने जोडावीत म्हणजे केवळ या दोन शहरांनाच नव्हे तर नाशिक लाही त्याचा मोठा फायदा होईल. कारण सध्या मुंबई आणि नागपूर मार्गामुळे मुंबई –नाशिक- औरंगाबाद हे एकमेकांना जोडले जाणार आहेतच. मुंबई ते हैद्राबाद या मार्गामुळे मुंबई आणि पुणे देखील हाय स्पीडने जोडले जाणार आहेत. याशिवाय राज्य शासनाने पुणे ते नाशिक दरम्यान हाय स्पीड रेल्वेसारखाच मार्ग प्रस्तावित केला आहे. त्यामुळे ही सगळी शहरे आपोआपच एकमेकाना जोडली जाऊन उद्योग –व्यवसायांना विशेषत: ऑटोमोबाईल उद्योगाला मोठे प्रोत्साहन मिळेल.

Exit mobile version