नुकतेच विकसित केलेले धान्यांचे 17 जैव-संरक्षित वाण देशाला केले समर्पित
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून अन्न आणि कृषी संघटनेच्या (एफएओ) 75 व्या वर्धापन दिनानिमित्त 75 रुपयांच्या स्मृती नाण्यांचे अनावरण केले. नुकतेच विकसित केलेले धान्यांचे 17 जैव-संरक्षित वाण देशाला समर्पित केले, यावेळी बोलताना पंतप्रधानांनी कुपोषण दूर करण्यासाठी सतत प्रयत्नशील असलेल्या जगभरातील लोकांना शुभेच्छा दिल्या. ते म्हणाले, आपले शेतकरी मित्र -आपले अन्नदाता , आपले कृषी वैज्ञानिक, आपल्या अंगणवाडी आशा कार्यकर्त्या हे कुपोषणाविरूद्धच्या चळवळीचा आधार आहेत. त्यांनी आपल्या मेहनतीने भारताचे धान्याचे कोठार भरले आहे आणि गरीबातील गरीब व्यक्तीपर्यंत ते पोहोचवण्यात सरकारला मदत करत आहेत. ते पुढे म्हणाले, या सर्व प्रयत्नांमुळे भारत कोरोनाच्या या संकटातही कुपोषणाविरोधात भक्कम लढा देत आहे.
पंतप्रधान म्हणाले की, गेल्या काही वर्षांमध्ये, एफएओने शेती उत्पादन वाढविण्यात आणि भारतासह जगभरातील उपासमारीचे निर्मूलन करण्यात मदत केली आणि पोषण वाढवण्यात मोठी भूमिका बजावली आहे. 130 कोटींहून अधिक भारतीयांनी या सेवेचा आदर केला आहे. ते म्हणाले की, जागतिक अन्न कार्यक्रमाला मिळालेला यंदाचा नोबेल शांतता पुरस्कारदेखील एफएओसाठी मोठे यश आहे. या ऐतिहासिक भागीदारी आणि सहभागाबाबत भारताला आनंद आहे असे ते म्हणाले. 2023 हे आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्ष जाहीर करण्याच्या भारताच्या प्रस्तावाला पूर्ण पाठिंबा दिल्याबद्दल पंतप्रधानांनी अन्न आणि कृषी संघटनेचे आभार मानले.
पंतप्रधान म्हणाले, छोट्या शेतकर्यांना बळ देण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना म्हणजेच एफपीओचे मोठे जाळे देशात विकसित केले जात आहे. धान्य वाया जाणे ही भारतात नेहमीच मोठी समस्या राहिली आहे आणि अत्यावश्यक वस्तू कायद्यात सुधारणा केल्यामुळे ही परिस्थिती बदलेल. आता सरकार तसेच खाजगी कंपन्यांना खेड्यांमध्ये चांगल्या पायाभूत सुविधा निर्माण करण्याची अधिक संधी मिळणार आहे.
शेवटी पंतप्रधान म्हणाले कि जेव्हा भारतीय शेतकरी बलवान होईल तेव्हा त्यांचे उत्पन्न वाढेल, आणि कुपोषणाविरूद्ध मोहिमेलाही समान बळ मिळेल. भारत आणि एफएओ यांच्यातला वाढता ताळमेळ या मोहिमेला आणखी गती देईल अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली