वर्धा :- समृद्धी महामार्गाच्या लगत असणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेताला लागून होणाऱ्या भिंतीमुळे शेतकऱ्यांच्या शेतीची वहिवाट बंद होणार नाही याची काळजी घेण्यात यावी. शेतीची कामे करण्यासाठी शेतकऱ्यांना योग्य रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा, तसेच पावसाचे पाणी शेतात शिरून पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी भूमिगत गटार बांधकाम योग्य पद्धतीने करण्यात यावे असे निर्देश पशुसंवर्धनमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिले.
आर्वी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. महामार्गासाठी शेतकऱ्यांकडून घेण्यात आलेल्या जमिनीतील छोटे तुकडे शिल्लक राहिल्यामुळे शेतकरी तिथे पीक घेऊ शकत नाहीत. त्यामुळे अशी प्रकरणे विशेष बाब म्हणून मंजूर करून घेण्यासाठी व शेतकऱ्यांना त्या शेतीचे पैसे देण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठवावा अशा सूचना श्री. केदार यांनी दिल्या.
महामार्गाच्या कामासाठी लागणारे बांधकाम साहित्य आणण्यासाठी आजूबाजूच्या गावातील रस्त्यांचा वाहतुकीसाठी उपयोग करण्यात आल्यामुळे जिल्हा व गावरस्ते खराब झाले आहेत. महामार्गाच्या कामामुळे खराब झालेले हे सर्व रस्ते दुरुस्ती करून देण्यात यावे तसेचआर्वी तालुक्यातील सर्व शेत पांदण रस्त्यांची कामे कंपनी सामाजिक दायित्व निधीतून करून देण्याच्या सूचना श्री. केदार यांनी यावेळी दिल्या.
आष्टी व कारंजा नगर पंचायत क्षेत्रातील भूमिगत गटार योजना व रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करण्यात यावीत. तसेच कारंजा नगर पंचायतीसाठी नियोजित पाणी पुरवठा योजनेचा प्रस्ताव मंत्रालयात पाठपुरावा करून मंजूर करून घेतो अशी हमी त्यांनी याप्रसंगी उपस्थित लोकप्रतिनिधींना दिली. कारंजा नगर पंचायत क्षेत्रातील घरकुल बांधण्यासाठी पूर्वी 113 कुटुंबांना देण्यात आलेल्या पट्ट्यांची यादी एकदा पुन्हा तपासून घ्यावी. त्यातील हयात नसलेल्या किंवा तिथे राहत नसलेल्या कुटुंबांची नावे वगळून इतरांच्या नावाचा त्यात समावेश करण्यात यावा असेही त्यांनी तहसीलदार आणि मुख्याधिकारी यांना सांगितले.
कारंजा येथील तालुका क्रीडा संकुलाची जागा ही झुडपी जंगल प्रकारात येत असल्यामुळे, त्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेऊन त्याचा प्रस्ताव वन विभागाकडे पाठवावा असेही पालकमंत्री श्री. केदार यांनी सांगितले. या बैठकीला अमर काळे,उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, समृद्धी महामार्गाचे नवनगरे प्रशासक उपजिल्हाधिकारी निशिकांत सुके, तहसीलदार आष्टी आशिष वानखेडे, आर्वी- विद्याधर चव्हाण, कारंजा- सचिन कुमावत, आष्टी व कारंजा मुख्याधिकारी पल्लवी राऊत उपस्थित होत्या.