समृध्दी महामार्ग ठरणार विदर्भाची भाग्यरेखा

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरेल – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

अमरावती, दि. ५ :  विदर्भाच्या सर्वांगिण विकासाचे ग्रोथ इंजिन ठरणाऱ्या महत्त्वाकांक्षी हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग देशातील सर्वोत्तम महामार्ग ठरणार आहे. विदर्भातील  नागपूर, वर्धा, अमरावती, वाशिम व बुलढाणा जिल्ह्यासाठी खऱ्या अर्थाने समृद्धी आणणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यातील नागपूर ते शिर्डी महामार्गाचे काम येत्या १ मे पर्यंत पूर्ण होऊन तो प्रत्यक्ष वाहतुकीसाठीही खुला होईल, असा विश्वास मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांनी आज समृद्धी महामार्गाच्या विदर्भातील सुमारे ३४७ किलोमीटर लांबीच्या रस्त्यांच्या कामाचा आढावा घेतला. तसेच त्यांनी अमरावती जिल्ह्यातील शिवनी-रसूलापूर येथे सहा किलोमीटर महामार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावरुन प्रवास करुन सुरु असलेल्या कामाबद्दल समाधान व्यक्त करताना या रस्त्याचे काम अप्रतिम झाल्याचा अभिप्राय दिला.

नगरविकास व सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री एकनाथ शिंदे, महिला व बालविकास मंत्री तथा अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर, वनमंत्री संजय राठोड, माजी खासदार आनंदराव अडसूळ, माजी आमदार वीरेंद्र जगताप, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव मनोज सौनिक, सचिव अनिल गायकवाड, राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार, विभागीय आयुक्त पीयुष सिंह, जिल्हाधिकारी शैलेश नवाल, मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे, पोलीस अधीक्षक हरी बालाजी उपस्थित होते.

नागपूर- मुंबई शीघ्र संचार द्रुतगती महामार्ग विदर्भातील चार जिल्ह्यातून जात असून या महामार्गासाठी ८ हजार ३६४ हेक्टर जमिनीचे अधिग्रहण पूर्ण झाले आहे. या महामार्गाचे बांधकाम सोळा टप्प्यात पूर्ण होत असून सुमारे ६० टक्क्यांपेक्षा जास्त रस्त्याचे बांधकाम पूर्ण झाले आहे. महामार्गाच्या बांधकामासोबतच जलसंधारणाच्याही कामांना प्राधान्य देण्यात आले असून अमरावती जिल्ह्यातील ३८ नाल्यांचे ९१ हजार २१० मीटर लांबीचे खोलीकरण करण्यात आले आहे. त्यामुळे महामार्गासोबतच जलसमृद्धी देखील झाली आहे.

हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्ग पूर्ण करण्यासाठी सर्वोच्च प्राधान्य असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, या महामार्गाची कामे लॉकडाऊन काळातही सुरू होती. त्यामुळे या कामामध्ये विलंब झाला नाही. हा महामार्ग देशातील सर्वोत्कृष्ट महामार्ग ठरणार असून नागपूर ते शिर्डी हा मार्ग येत्या १ मे पर्यंत व त्यानंतर मुंबई पर्यंतचे काम पुढच्या एक वर्षात पूर्ण करण्यात येणार आहे. हा महामार्ग दळणवळणाच्या सर्वोत्कृष्ट सुविधांसोबतच कृषी व पूरक उद्योगांनाही प्रोत्साहन देणारा ठरणार असल्यामुळे तो राज्याच्या सर्वांगिण विकासासाठी रोल मॉडेल ठरेल.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातर्फे नागूपर ते मुंबई शीघ्रसंचार दृतगती मार्गापैकी अमरावती जिल्ह्यातून ७३.३३ किलोमीटर लांबीचा राहणार आहे. यामध्ये धामणगाव रेल्वे, चांदूररेल्वे व नांदगाव खंडेश्वर या तीन तालुक्यातील ४६ गावांमधून जाणार आहे. २ हजार ८५० कोटी रुपये खर्चून तिसरा टप्पा पूर्ण करण्यात येणार आहे. या महामार्गावर दोन इंटरचेंज प्रस्तावित आहेत.