ग्राम कृषी संजीवनी समित्या तातडीने गठित करा

  • ग्राम कृषी संजीवनी समित्यांचे कामकाज करण्यास ग्रामसेवक युनियन तयार

मुंबई, दि. 2 : शेतकरी बांधवांच्या प्रगतीसाठी ग्राम कृषी संजीवनी समिती महत्वाची असून या समित्या तातडीने गठित कराव्यात, विशेषत: अकोला, अमरावती, बुलडाणा, जालना जळगाव जिल्ह्यातील समित्या गठित करण्याची प्रक्रिया तातडीने गतिमान करावी, ग्रामसेवकांनी या समितीच्या कामकाजात सदस्य सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारून कामकाज सुरू करावे, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. तसेच ग्रामसेवकांची रिक्त पदे प्राधान्याने भरण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्र्यांनी दिली.

नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करून अंमलबजावणी करण्याबाबत मंत्रालयातील उपमुख्यमंत्री कार्यालयाच्या समिती सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होत. या बैठकीला अॅड. रोहिणी खडसे, नियोजन विभागाचे अपरमुख्य सचिव देबाशिष चक्रवर्ती, ग्रामविकास विभागाचे अपर मुख्य सचिव अरविंद कुमार, उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या संचालक इंद्रा मालो, कृषी सचिव एकनाथ डवले उपस्थित होते. तर व्हीसीद्वारे जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र ग्रामविकास युनियनचे अध्यक्ष एकनाथराव ढाकणे, सरचिटणीस प्रशांत जामोदे, राज्य कोषाध्यक्ष संजीव निकम, पुंडलिक पाटील उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, ग्रामीण भागाच्या विकासासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पांतर्गत ग्राम कृषी संजीवनी समिती स्थापन करण्याची कार्यवाही तातडीने पूर्ण करावी. विशेषत:अकोला, अमरावती, बुलडाणा जालना, जळगाव जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी या समित्या गठित करण्याची प्रक्रिया गतिमान करावी. औरंगाबाद, बीड, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ जिल्ह्यातील उर्वरित समित्यांचे गठण करावे. समित्या गठित करण्याचे काम प्राध्यान्याने करून गावातील कामे मार्गी लावावीत.

उपमुख्यमंत्र्यांच्या आवाहनाला ग्रामसेवक युनियनचा प्रतिसाद

ग्राम कृषि संजीवनी समितीत सदस्य सचिव म्हणून काम करण्याबाबतच्या अडचणी ग्रामसेवक युनियनच्या पदाधिकाऱ्यांकडून उपमुख्यमंत्र्यांनी जाणून घेतल्या. या युनियनचे म्हणणे उपमुख्यमंत्र्यांनी ऐकून घेऊन ग्राम कृषि संजीवनी समितीत सदस्य सचिव म्हणून ग्रामसेवकांनी काम करावे, असे आवाहन केले. नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबवून शेतकऱ्यांसाठी थेट काम करण्याची संधी या निमित्ताने ग्रामसेवकांना मिळते आहे. त्यामुळे या योजनेचे काम करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांनी घ्यावी. जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून शेतकरी बांधवांच्या हितासाठी काम करावे, असे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या आवाहनाला प्रतिसाद देत ग्रामसेवक युनियनने कामकाज सुरू करण्याचे मान्य केले. यावेळी उपमुख्यमंत्र्यांनी ग्रामसेवकांची पदे प्राधान्याने भरण्यात येतील, अशी ग्वाही दिली.