नागपूर, दि. 19 : प्रयोगशील शेतकऱ्यांचे वेळोवेळी मार्गदर्शन घेत परंपरागत शेती करताना शेतकऱ्यांनी नवीन पीकपद्धती अनुसरावी, नवीन तंत्रज्ञानाचा वापर आणि जोडधंद्याला प्राधान्य देत कृषी मालावर प्रक्रिया करावी. कृषीपूरक व्यवसायातूनच शेतक-यांची प्रगती होणार असल्याचे पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार यांनी आज येथे केले.
जिल्हा परिषदेच्या कै. आबासाहेब खेडकर सभागृहात आयोजित प्रयोगशिल अशा 65 शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा श्रीमती रश्मी बर्वे, कृषी सभापती तापेश्वर वैद्य, इतर पदाधिकारी, तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे प्रामुख्याने उपस्थित होते.
कोरोना काळात सर्व घटक लॉकडाऊन होते. मात्र शेतकरी राबत होता. विधानसभेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन संपल्यानंतर जिल्ह्यातील विकासकामांना गती देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र कोरोनामुळे सर्व जग थांबले होते, असे सांगून श्री. केदार म्हणाले की, शेतकऱ्यांना शैक्षणिक अनुभव नसला तरी शेतकरी त्यांच्या कष्टातून अनुभव घेत शिकतात. त्यामुळे त्यांचा अनुभव मोठा आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कृषीविषयक विशेष उपक्रम राबविताना कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पंचायत समितीचे पदाधिकारी व जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या अधिकाऱ्यांनी उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या समस्या सोडवल्या पाहिजेत. त्यामुळे शेतकऱ्यांना योजनांची माहिती घेताना त्याचा फायदा होईल. पदिाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी वारंवार बैठका घेत प्रयोगशिल शेतकऱ्यांकडून मार्गदर्शन केले पाहिजे. जेणेकरुन परंपरागत शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना फायदा होईल, असे आवाहन श्री. केदार यांनी केले.
पीक विमा योजनेत राज्य शासनाने मोठ्या प्रमाणावर निधी दिला असून, त्यासाठी तालुका स्तारावरील पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांना लाभ मिळवून देण्यासाठी पदाधिकारी व अधिकारी यांनी लक्ष घातले पाहिजे. पारंपरिक पीक पद्धतीने शेती करण्यापेक्षा इतर नगदी पिकांकडे शेतकऱ्यांना वळवा. रामटेक तालुक्यात मोठ्या प्रमाणावर पानमळे होते. ते कमी झाले आहेत. आता नागपुरात लागणारे खायचे पान पश्चिम बंगालमधून येते, हे बदलले पाहिजे, असे आवाहन करुन श्री. केदार म्हणाले की, कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये दररोज 300 ट्रक भाजीपाला येतो. त्यातील जवळपास 200 ट्रक हे परराज्यातून येतात. यात नागपूर जिल्ह्यातील भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांचा भाजीपाला का येत नाही, याचा विचार करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
खुबाळा येथील शेतकरी उत्तम शेती करतात. तिथे दाळमिलसह विविध कृषी उत्पादन प्रक्रिया उद्योग सुरु असून, त्यातून रोजगार उपलब्ध करून देण्यात येत आहे. सर्वात जास्त रोजगार मिळवून देणारा कृषी विभाग असून, त्याला संलग्नित बकरी पालन व कुक्कुटपालनाचे नवे जोडधंदे सुरु करण्याचे शेतकऱ्यांना त्यांनी आवाहन केले. ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यासाठी बकरी व कुक्कुटपालनाकडे लक्ष देण्यात येणार असल्याचे सांगून प्रयोगशिल शेतकऱ्यांच्या यशकथा सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा. त्यातून इतर शेतकऱ्यांना प्रोत्साहन मिळेल. या यशकथांच्या माध्यमातून नागपूर जिल्हा परिषदेने चांगला उपक्रम सुरु करावा, असे आवहानही श्री. केदार यांनी यावेळी उपस्थितांना केले. यावेळी कृषी सभापती तापेश्वर वैद्य यांचेही समयोचित भाषण झाले.
पीक पद्धती बदला – बळवंत गडमल
प्राध्यापकाची नोकरी करायची होती पण नोकरी न करता मी शेती करण्याला प्राधान्य दिले. 2009पासून शेती करायला सुरु केली असून, ते बीबीएफ तंत्रज्ञान वापरतात. तसेच त्यांनी कापसाचे पीक घेणे जवळपास बंद केले असल्याचे सांगून परंपरागत शेतीला फाटा देऊन नवनवीन पीकपद्धतीने शेतीचे उत्पादन घेण्याचे आवाहन करताना प्रयोगशील शेतकऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन शेतकऱ्यांनी प्रयोगशील शेतीकडे वळण्याचे आवाहन गडमल यांनी केले.
सेंद्रीय शेतीकडे वळा – सेवक उईके
शेती व पशुधन, मत्स्य, बकरीपालन उत्पादक शेतकरी म्हणून नावाजलेले असलेल्या सेवक उईके यांनी रासायनिक खतांच्या अतिरेकी वापरामुळे शेतीचा पोत बिघडत चालला असून, त्यासाठी दूध उत्पादन अर्थात पशुपालन करण्याचा उपस्थितांना सल्ला दिला. शेतीचा पोत आणि माणसांचे पोट सध्या बिघडले आहे, असे सांगून रासायनिक खतांवर मिळणारे अनुदान कमी करावे. जेणेकरून शेतकरी सेंद्रीय शेतीकडे वळेल. तसेच शेतकऱ्यांनी कृषी उत्पादन प्रकियाकडे वळण्याचे आवाहन करताना श्री. उईके यांनी दुधातील भेसळ वाढली आहे. हे भेसळीचे प्रकारही थांबविण्याचे आवाहन मंत्री केदार यांना केले.
हिरवा चारा उत्पादनाकडे वळा – डॉ. उल्हास निमकर
शेतकऱ्यांच्या मुलांना अनंत अडचणी येतात. शेतकऱ्यांकडून त्या अडचणी सोडविताना शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत नवनवीन प्रयोग केले पाहिजेत. दूध उत्पादक शेतक-यांना दुधाळू जनावरांसाठी वर्षभर हिरवा चारा मिळत नाही. त्यामुळे त्यांनी हिरवा चारा उत्पादन करणा-या 55 शेतक-यांचा गट बनविला असून, या गटाच्या माध्यमातून ते थेट ग्राहकांना घरपोच चारा उपलब्ध करुन देत असल्याचे सांगितले.
या प्रयोगशील शेतकऱ्यांचा झाला सत्कार
यावेळी सेंद्रीय शेती उत्पादक तुळशीराम बेहरे, सचिन कवडूजी सरवदे, लिंगा, अविनाश पारधी,दीपक मधुकर वासेकर, धामना लिंगा, विठ्ठल मोहनदास मनियार, धानउत्पादक हेमराज नारायण धोंगडे, ढवळी पेंढरी, देवराव राऊत, अविनाश सहदेवराव गवळी, सेवक उईके लिहगाव, श्रावण देवराव मासूरकर, प्रफुल्ल वानखेडे, विनोद कृष्णराव येळणे, विजय गंगाधर महाकाळकर, चंद्रभान श्रीराम सावरकर, शिशुपाल मेश्राम कुही, दिलीप मुळे, गुमथळा, सुरेश ढोले सोनेगाव, महादेव झाडे, उमरी, सरपंच सुधीर गोतमारे, खुर्सापार, कृषीभूषण पुरस्कार प्राप्त शेतकरी सुनील हुमदे, सावंगी, कैलास गुरव, सतीश मोहोड, मेघराज तागडे गोगली, श्रीमती सुनंदा सालोडकर, सेंद्रीय शेती पुरस्कार प्राप्त शेतकरी सुधाकर कुबडे, सेलू, रमेश मेंढे, मोहदी, श्याम डवरे, चेतन होडे, हळद उत्पादक अनंत गोडबोले, वासुदेव वाडकर, रुपचंद शेंडे रिसाळा, श्रीराम लांजेवार कान्हा देवी, संजय रमेश नेमाडे, सुखदेव गुरवे करंभाड, सुनील गोठवाड, राजेश शिवरकर, पारशिवनी कमलाकांत बसबुजे, उमाकांत पोफळी मानापूर, चंद्रभान धोटे, जनार्दन भगत, अरुण खडसे, भिलेवाडा, विजय मोहरे, चिचाला, किरण चौधरी, मनसर, राजू खोब्रागडे, चिरवा, राहुल मेश्राम, गजानन घाडगे, अरुण बालपांडे खुर्सापार, हरीभाऊ शिंदे, मकरधोकडा, ईश्वर ठाकरे, कुराडी, श्री. बैस आकोली, श्री. चापले विरखंडी, रामभाऊ ईरगुडकर, मांढळ, नारायण रांबड, रियाज शेख, रोहन राऊत उखळी, प्रवीण वंजारी मोखाळा यांच्यासह इतरही शेतकऱ्यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शुभांगी कामडी –भस्मे यांनी तर वंदना भेले यांनी आभार मानले