कालवे सल्लागार समिती व जिल्हास्तरीय पाणी वाटप समिती बैठक
बोर प्रकल्पातील पाण्याचे सिंचनासाठी नियोजन करताना यावर्षी गहू, हरभरा आणि उन्हाळी पीक घेताना जनावरांच्या चाऱ्यासाठी घेण्यात येणाऱ्या पिकांसाठी पाणी आरक्षण करून ठेवावे. त्याचबरोबर पाणीवाटप संस्थांच्या सक्रीय सहभागासाठी आर्वी आणि सेलू येथे कार्यशाळा घेण्यात याव्यात, अशा सूचना पालकमंत्री सुनिल केदार यांनी दिल्या.
आज जिल्हा परिषद सभागृहात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बोर प्रकल्पाची कालवे सल्लागार समिती आणि जिल्हास्तरीय पाणी वाटप समितीची बैठक पार पडली. यावेळी श्री.केदार बोलत होते. या बैठकीला जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, लाभक्षेत्र विकास प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी, कार्यकारी अभियंता श्री.रहाणे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी सत्यजित बडे, उपवन संरक्षक सुनील शर्मा, जिल्हा अधीक्षक कटुशी अधिकारी उपस्थित होते.
यावर्षी बोर प्रकल्प 100 टक्के भरला असून सिंचनासाठी 98.77 दशलक्ष घनमीटर पाणी शिल्लक आहे. यातून 13 हजार 500 हेक्टर क्षेत्र सिंचित होऊ शकते. याचे नियोजन करताना कृषी विभागाचा सक्रिय सहभाग दिसत नसल्याबाबत पालकमंत्र्यानी नाराजी व्यक्त केली. कापसावर तीन वर्षांपासून गुलाबी बोन्ड अळीचा प्रादुर्भाव होत आहे. यासाठी शासन शेतकऱ्यांना फरतड घेऊ नका आणि एप्रिल, मे पर्यंत कापसाचे उत्पादन लांबवू नये असे सांगत असतानाही सिंचनासाठी पाणी देताना नोव्हेंबरच्या पुढे कापसाला 50 टक्के पाणी का ठेवण्यात आले? याबाबत श्री.केदार यांनी आक्षेप घेतला. यावर्षी पाणी शिल्लक आहे, त्याचा उपयोग गहू आणि हरभरा पिकाच्या क्षेत्रात वाढ करून त्याला सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. शेतकऱ्यांचे दरडोई उत्पन्न कसे वाढविता येईल याचा विचार करून पिकांचे पद्धतीत बदल करावा. गहू 50 टक्के आणि हरभरा 25 टक्के तसेच इतर पिकासाठी 25 टक्के याप्रमाणे नियोजन करण्यास श्री.केदार यांनी सांगितले.
त्याचबरोबर पिण्याच्या पाण्यासाठी धरणाच्या आजूबाजूच्या गावातील ग्रामपंचायतींची मागणी नाही ना याबाबत खात्री करण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर प्रकल्पाची निर्मित सिंचन क्षमता आणि प्रत्यक्ष सिंचन यावर चर्चा करताना उद्दिष्टापेक्षा सिंचन कमी होण्याचे कारणांचा अभ्यास करण्यास सांगितले. कालवे, पाटचऱ्या नादुरुस्त असतील तर दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठविण्याचे निर्देश दिले.
पाणी वाटप सहकारी संस्थांच्या सक्रिय सहभागासाठी प्रकल्प निहाय कार्यशाळा घेण्यास सांगून सूक्ष्म सिंचन करण्यासाठी शेतकऱ्यांमध्ये पाण्याचा काटकसरीने वापर करण्यासाठी जनजागृती करावी. त्यांची जुनी थकबाकी वसूल करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी नियोजन करावे. निम्न वर्धा प्रकल्पात यावर्षी 242.537 दशलक्ष घनमीटर उपयुक्त पाणी साठा आहे. सिंचनासाठी धरण व इतर बॅरेज व उपसा सिंचन प्रकल्प मिळून 51.406 दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षित आहे. यातून 45 हजार 160 हेक्टर सिंचन होऊ शकते. निम्न वर्धा प्रकल्प कालवे विभागाने पाण्याचे पीकनिहाय नियोजन न केल्याबाबत श्री.केदार यांनी नाराजी व्यक्त केली. कृषी व कालवे विभागाने तीन दिवसात निम्न वर्धा प्रकल्पातील पाणी कोणकोणत्या पिकासाठी किती ठेवायचे याचे सूक्ष्म नीयोजन करून आराखडा सादर करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. जिल्ह्यात रब्बीचे, उन्हाळी पिकाचे क्षेत्र वाढविण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. पाण्याचे व्यवस्थित नियोजन केल्यास शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध होऊन त्याचे आर्थिक उत्पन्न वाढविण्यासाठी काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.