राज्यात लवकरच सुरु होणार पहिली ते सातवीचे वर्ग

सध्या राज्यातील ग्रामीण भागात पाचवी ते बारावीचे वर्ग सुरू आहेत. तर शहरी भागात आठवीपासून पुढीचे वर्ग सुरू आहेत. मात्र पहिली ते चौथीचे वर्ग बंद आहेत. हे वर्ग सुरु करावेत असा प्रस्ताव शालेय शिक्षण विभागाचा आहे.  पहिली ते सातवीच्या शाळा सुरु करण्यासाठी आरोग्य विभागाची कोणतीही अडचण नाही, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबत येत्या 10 दिवसात अंतिम निर्णय होऊ शकतो

राज्यातील पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू करण्याबाबत कोव्हिड टास्क फोर्सच्या शिफारसी अंतिम असल्याने कोरोनाचा संसर्ग कमी झाल्यानंतरही हे वर्ग अद्याप सुरू झालेले नाहीत. मात्र, आता या टास्क फोर्सनेही हे वर्ग सुरू करण्याबाबत अनुकुलता दर्शविणारा अहवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिला आहे. पहिली ते चौथीपर्यंतची शाळा नियम पाळून सुरू करायला हरकत नाही, असे या टास्क फोर्सचे अहवालातील म्हणणे आहे. लांब राहून खेळता येणाऱ्या मैदानी खेळांनाही परवानगी देण्यात येईल. क्रिकेट, धावण्याची शर्यतीला परवनगी असेल. पण खोखो, कबड्डीला परवानगी नको अशी शइफारस यात करण्यात आली आहे.

चाईल्ड टास्क फोर्सच्या बैठकीत डॉक्टरांचे यावर एकमत झाले आहे. गतिमंद मुलांच्या शाळाही नियम पाळून सुरू करायला हरकत नसल्याचे टास्क फोर्सचे म्हणणे आहे. वसतीगृहात राहाणाऱ्यांची सुरुवातीला कोरोना टेस्ट करून त्यांना शाळेत प्रवेश द्यावा. एखादा व्यक्ती पुन्हा बाहेर गेली, तर पुन्हा येताना टेस्ट सक्तीची करावी. केंद्राशी बोलून लहान मुलांच्या लसीकरणाबाबत तत्परता राज्याने दाखवावी. शाळा सुरू करत लसीकरण केल्यास काहीच अडचण नसल्याचे यातील डॉक्टरांचे मत आहे.

ते म्हणाले, “राज्यात सध्या 700-800 रुग्ण आढळून येत आहेत. रुग्ण बरे होण्याचा दर देखील चांगला आहे. पालकांनी शाळा व्यवस्थापनावर विश्वास ठेऊन मुलांना शाळेत पाठवण्यासंदर्भात संमतीपत्र द्यावे. मुख्यमंत्र्यांनी निर्णय घेतल्यानंतर पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवावे.”