नाशिक : दि. 30 – महाराष्ट्र पोलीस दलाला कर्तव्यदक्षतेचा समृद्ध वारसा आणि इतिहास लाभला आहे. आजच्या कोरोना संकटातही पोलिसांनी आपल्या कर्तव्यदक्षतेत कुठलीही तडजोड केलेली नाही. पदोपदी रूपं बदलणारा कोरोनाचा विषाणू आणि त्याच गतीने क्षणोक्षणी स्वरूप बदलणारी गुन्हेगारी ही महाराष्ट्र पोलीस दलासमोरची आजची मोठी आव्हाने आहेत, अशाही परिस्थितीत या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी पोलिसांनी दाखवलेले धैर्य व शौर्य हे गौरवास्पद असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी केले आहे.
महाराष्ट्र पोलीस अकादमीतील प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरीक्षक 118 व्या सत्राच्या च्या दीक्षान्त संचलन समारंभाच्या प्रसंगी दूरदृश्य प्रणालीद्वारे संबोधित करताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार दूरदृश्य प्रणालीद्वारे तर पोलीस महासंचालक, रजनीश शेठ, अपर पोलीस महासंचालक (प्रशिक्षण व खास पथके) संजयकुमार, नाशिक शहराचे पोलीस आयुक्त दीपक पांडेय, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच्या संचालक अश्र्वती दोरजे, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक प्रताप दिघावकर, नाशिक ग्रामीणचे पोलीस अधिक्षक सचिन पाटील, प्रभारी सहसंचालक तथा उप संचालक (प्रशिक्षण), गौरव सिंग, उपसंचालक (प्रशासन), शिरीष सरदेशपांडे उपसंचालक (सेवांतर्गत प्रशिक्षण), काकासाहेब डोळे, सहा.संचालक ( कवायत ) अभिजीत पाटील तसेच प्रबोधिनीमधील सर्व सहायक संचालक, वैद्यकीय अधिकारी विधी निदेशक, सहा कवायत निदेशक प्रत्यक्ष उपस्थित होते.
यावेळी बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, कर्तव्यदक्ष व धैर्यवान पोलिसांची दीर्घ परंपरा महाराष्ट्राला लाभली आहे. अशा पोलीस दलात सहभागी होणाऱ्या प्रशिक्षणार्थी पोलिसांचे मी अभिनंदन करतो. तसेच आज पोलीस दलासमोर दिसणाऱ्या व न दिसणाऱ्या शत्रूंचे मोठे आव्हान असून एकीकडे आमचे पोलीस गडचिरोलीत नक्षलवाद्यांशी लढताना दिसतात तर दुसरीकडे हेच पोलीस कोरोना संकटाचा सामना निकराने करताना दिसतात. दिसणाऱ्या शत्रूवर आपण तुटून पडतो पण आज पण न दिसणाऱ्या कोरोनासारख्या शत्रूशीही पोलीस जीवाची बाजी लावून लढताहेत, याबद्दल पोलिसांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, प्रसंगावधानता हा अत्यंत महत्त्वाचा गुण पोलिसांच्या अंगी आवश्यक असतो. कधीकधी एखादी कारवाई केली तर का केली? म्हणून प्रश्न उपस्थित केले जातात तर नाही केली तरी का नाही केली? याद्दबद्दलही प्रश्न उपस्थित केले जातात, अशा वेळी ‘होश आणि जोश’ यांचे तारतम्य ठेवून निर्णय घ्यायचे असतात. माणसाची इच्छाशक्ती हा अत्यंत महत्त्वाचा गुण असतो आणि ही इच्छाशक्तीच आपली स्वप्न निश्चित करत असते. आज पोलीस अकादमीतून बाहेर पडणाऱ्या प्रशिक्षणार्थींनी पोलीस दलात जायचं स्वप्न पाहिलं आणि ते साकार केलं ही जीवनातली फार मोठी उपलब्धी आहे, अशी स्वप्नं पाहायला मोठी दुर्दम्य इच्छाशक्ती लागते, ती पोलीस दलात येणाऱ्या प्रत्येकाच्या ठायी असते. भविष्यात तुमची स्वप्नं ही केवळ तुमची स्वप्नं नाहीत तर ती संपूर्ण महाराष्ट्राची स्वप्नं आहेत. म्हणून हे सर्व प्रशिक्षणार्थी पोलीस उपनिरिक्षक जनतेच्या विश्वासाला सार्थ ठरवतील असा आशावादही यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांनी व्यक्त केला.
माणुसकी आणि बंधुत्वाच्या भावनेतून कर्तव्य करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
पोलिस उपनिरीक्षक म्हणून जबाबदारी पार पाडत असताना, नियमानं, कायद्यांनं वागा. परंतु, कायदा पाळताना, तुमच्यातली माणुसकीची, बंधुत्वाची भावना हरवू नका. तुम्ही घातलेल्या खाकी वर्दीच्या आत, जोपर्यंत माणुसकी जिवंत आहे, तोपर्यंतच तुमच्या खांद्यावरच्या स्टारना किंमत आहे. हे कायम लक्षात ठेवा, असे यावेळी मार्गदर्शन करताना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री श्री पवार म्हणाले, मला आनंद आहे की, आपल्यापैकी अनेक जण शेतकरी, कष्टकरी, मध्यमवर्गीय, सामान्य कुटुंबातून आले आहेत. शेतकऱ्याच्या, कष्टकऱ्याच्या, सामान्य माणसाचे दु:ख, अडचणी काय असतात हे तुम्हाला माहित असलं पाहिजे. रोज कष्ट करुन रोजंदारीवर पोट भरणाऱ्या लोकांच्या वेळेचं, श्रमाचं मोल तुम्ही समजलं पाहिजे. ही सामाजिक जाणीव तुमच्याकडे असेल तरच, पोलिस स्टेशनमध्ये मदतीसाठी आलेल्या सामान्य माणसाला तुम्ही न्याय देऊ शकाल. तुम्ही पोलिसांचे, शासनाचे प्रतिनिधी म्हणून समाजात वावरणार आहात. समाजातील सामान्य माणसाशी तुमचा संबंध येणार आहे. या सामान्य माणसाशी तुम्ही कसे बोलता, त्यांच्याशी कसे वागता, त्याच्या प्रश्नांकडे कसे बघता, ते कसे सोडवता, यावरच तुमची, तुमच्या वरिष्ठांची आणि शासनाची प्रतिमा तयार होत असते.
पोलिस स्टेशनमध्ये न्याय मागण्यासाठी येणाऱ्या, सामान्य माणसांचे प्रश्न तुमच्यासाठी किरकोळ, किंवा तुम्हाला लहान वाटले, तरी सामान्य माणसासाठी, त्याच्या कुटुंबासाठी ते प्रश्न खूप मोठे असतात. या सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याचा तुम्ही प्रामाणिकपणे प्रयत्न केला पाहिजे. सगळेच प्रश्न कायद्याने, नियमाने सुटतात असं नाही, परंतु माणुसकीच्या भावनेतून अनेक प्रश्न सोडवले जाऊ शकतात, या सकारात्मक विचारातून आपण काम केलं पाहिजे. आपण सर्व पदवी आणि पदवीपेक्षा अधिक शिक्षण घेतलेले आहात. एमपीएससी परीक्षा पास होऊन पोलिस सेवेत आला आहात. या यशामागे अनेक वर्षांचे कष्ट, मेहनत, परिश्रम आहेत. संयमही मोठा आहे. त्याबद्दल तुमचं कौतुक आहे. परंतु, हे यश तुमच्या एकट्याचं नाही, तुमचे आई-वडील, बहिण-भाऊ, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी, सहकारी, समाजाचं या यशात योगदान आहे, तुमच्या यशामागे अनेकांचा त्याग आहे, हे लक्षात ठेवा. त्यामुळे समाजाला जेव्हा जेव्हा तुमची मदत लागेल, तेव्हा तेव्हा ती देऊन, समाजाच्या ऋणाची परतफेड करण्याचं कर्तव्य तुम्ही पार पाडाल, असा विश्वास व्यक्त करतो. तुमच्या या यशाबद्दल तुमचे आई-वडील, बहिण-भाऊ, मित्र-मैत्रिणी, शिक्षक, शेजारी, सहकारी, सर्वांचं मी अभिनंदन करतो. त्यांचेही आभार मानतो. आज पोलिस उपनिरीक्षक म्हणून सेवेत आलेले तुम्ही सर्वजण, राज्याची कायदा-सुव्यवस्था कायम राखण्यात मोलाचं योगदान द्याल. आपली सेवा प्रामाणिकपणे कराल.
सर्वांना माझे आवाहन आहे की, आपली बांधिलकी ही भारतीय राज्यघटनेशी, नियम व कायद्यांशी असली पाहिजे. जात-पात, धर्म-पंथ, वैचारिक बांधिलकी, राजकीय-सामाजिक-धार्मिक विचारसरणी या गोष्टींना वैयक्तिक आणि सार्वजनिक जीवनात स्थान असणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. याउपरही वैयक्तिक आस्थांचं पालान करायचं असेल तर ते घराच्या उंबरठ्याच्या आत करावं, वैयक्तिक आस्थांचं प्रदर्शन टाळावं, यातूनच देश पुढे जाण्यास मदत होणार आहे, असेही यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
महाराष्ट्र पोलीस दलाचे पोलीस महासंचालक रजनीश शेठ यांनीही प्रशिक्षणार्थी यांचे महाराष्ट्र पोलीस दलामध्ये स्वागत करुन पुढील सेवा काळामध्ये पोलीस दलास आणि जनतेस योगदान देणार आहात. चांगल्या गोष्टींचा आदर करुन वाईट गोष्टींपासुन नेहमी दूर राहा असा सल्ला देऊन जनतेला सेवा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले पाहिजे. पोलिसांवर कोणी हात उचलला तर त्यास योग्य रितीने प्रत्युतर देण्यासाठी तयार असावे. आपल्या कर्तव्यामधून आणि आचरणामधून ओळख निर्माण झाली पाहिजे, असे सांगून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
कोविड -१९ या विषाणुचा प्रार्दुभाव होऊ नये, याकरिता मर्यादित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये समारंभ आयोजित करण्यात आला होता. हा दीक्षान्त समारंभ प्रशिक्षणार्थी यांचे पालक, मित्रपरिवार व इतरांना पाहता यावा, याकरिता महाराष्ट्र पोलीस अकादमीने यूट्यूब लिंकद्वारे दीक्षान्त समारंभाचे थेट प्रक्षेपण केले.विशेष प्राविण्य मिळविलेल्या विविध परितोषिकप्राप्त प्रशिक्षणार्थींना कोविड-१९ च्या अनुषंगाने प्रत्यक्ष बक्षीस वितरण सोहळा पार न पडता पुरस्कारार्थी यांची नावे पुकारुन सन्मानित करण्यात आले. सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून मानाची रिव्हॉल्वर ( Revolver of Honour ) , उत्कृष्ट आंतरवर्ग प्रशिक्षणार्थी, सर्वोत्कृष्ट महिला प्रशिक्षणार्थी म्हणून अहिल्यादेवी होळकर कप या तीनही पुरस्कारांची मानकरी म्हणून शुभांगी चंद्रकांत शिरगावे या महिला प्रशिक्षणार्थीस सन्मानित करण्यात आले. तसेच सलीम शेख या प्रशिक्षणार्थींना उत्कृष्ट बाह्यवर्ग प्रशिक्षणार्थी म्हणून परितोषिक देण्यात आले. तर अविनाश वाघमारे या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यास व्दितीय सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी म्हणून सन्मानित करण्यात आले.