Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

कोविड लस : पंतप्रधानांची पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटला भेट

पुणे, दि.२८:- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज  सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला भेट देऊन कोविड-१९ विषाणू प्रतिबंधात्मक लस विकास, उत्पादन, वितरण, साठवण आणि व्यवस्थापन प्रक्रियेची माहिती घेतली. यावेळी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे मुख्य कार्यकारी संचालक डॉ. सायरस पुनावाला, मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला, कार्यकारी संचालक नताशा पुनावाला, शास्त्रज्ञ तसेच संबंधित विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

प्रारंभी अदर पुनावाला यांनी संस्थेची माहिती दिली. त्यानंतर प्रधानमंत्री श्री. मोदी यांनी सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या संस्थेतील कोविड-१९ प्रतिबंधात्मक लस निर्मितीच्या अनुषंगाने सुरु असलेल्या कामाची   पाहणी केली. यावेळी त्यांना लस देण्याच्या प्रयत्नांची पूर्वतयारी, आव्हाने आणि नियोजन यांची माहिती शास्त्रज्ञांनी दिली.

पंतप्रधानांनी हैदराबादमधील भारत बायोटेकला दिली भेट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी, लस विकास आणि उत्पादन प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठीच्या तीन शहरांच्या आपल्या दौऱ्यादरम्यान आज हैदराबाद मधील भारत बायोटेक सुविधा केंद्राला भेट दिली.

“स्वदेशी कोविड लसीबद्दल हैदराबाद येथील भारत बायोटेक सुविधा केंद्रामध्ये माहिती देण्यात आली. लसीसंदर्भात आतापर्यंतच्या चाचण्यांमध्ये झालेल्या प्रगतीबद्दल शास्त्रज्ञांचे अभिनंदन केले. त्यांची टीम या कार्यात वेगाने प्रगती व्हावी यासाठी आयसीएमआर बरोबर काम करत आहेत.”, असे पंतप्रधानांनी ट्विट मध्ये म्हटले आहे.

पंतप्रधानांनी सकाळी अहमदाबाद येथील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. येथील झायडस केडिला मध्ये डीएनए वर आधारित स्वदेशी लस विकसित होत आहे त्याबद्द्ल जास्त माहिती घेणे हा या भेटीमागील उद्देश होता.

“झायडस केडिला मध्ये तयार होत असलेल्या डीएनएवर आधारित स्वदेशी लसीबाबत अधिक माहीती जाणून घेण्यासाठी आज अहमदाबादेतील झायडस बायोटेक पार्कला भेट दिली. या कामासाठी परिश्रम घेत असलेल्या टीमचे मी कौतुक करतो.. त्यांच्या या कार्यप्रवासात भारत सरकार नेहमीच त्यांच्या सोबत आहे.” , असे पंतप्रधानांनी  आपल्या ट्विट संदेशात नमूद केले आहे.

Exit mobile version