पेट्रोलच्या उत्पादन शुल्कात पाच रुपये आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात 10 रुपये कपात
भारत सरकारने उद्यापासून पेट्रोल आणि डिझेलच्या उत्पादन शुल्कात ( अबकारी करात) अनुक्रमे पाच रुपये आणि दहा रुपयांची कपात करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर त्यानुसार कमी झाले आहेत.
डिझेलच्या उत्पादन शुल्कातील कपात पेट्रोलच्या कपातीच्या दुप्पट असेल. भारतीय शेतकऱ्यांनी लॉकडाऊनच्या काळातही कठोर परिश्रम करून आर्थिक विकासाचे चक्र सुरुच ठेवले आणि डिझेलच्या उत्पादनशुल्कातील भरीव कपातीमुळे आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना फायदे मिळतील.
अलीकडच्या काही महिन्यांमध्ये जागतिक पातळीवर खनिज तेलाच्या किमतींमध्ये मोठी वाढ झालेली पाहायला मिळाली, ज्यामुळे देशातील बाजारांमध्ये अलीकडच्या काही आठवड्यांमध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात वाढ होऊन त्याचा महागाईच्या दरावर परिणाम झाला. त्याच प्रकारे जगामध्ये सर्व प्रकारच्या उर्जा साधनांच्या दरातही मोठ्या प्रमाणावर वाढ आणि साधनांची टंचाई पहायला मिळाली. मात्र, भारत सरकारने देशात उर्जेची कोणत्याही प्रकारे टंचाई होणार नाही आणि पेट्रोल आणि डिझेल यांसारखी इंधने आपल्या गरजांच्या पूर्ततेसाठी योग्य प्रमाणात उपलब्ध राहतील हे सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले.
कोविड-19 मुळे सर्व व्यवहार ठप्प झाल्यानंतर, भारताच्या आकांक्षी लोकसंख्येमध्ये असलेल्या उद्यमशील वृत्तीमुळे भारताच्या अर्थव्यवस्थेने अतिशय उल्लेखनीय पद्धतीने पुन्हा भरारी घेतली. अर्थव्यवस्थेमधील सर्वच क्षेत्रे मग ते उत्पादन असो, सेवा किंवा कृषी असो या सर्वांमध्येच अतिशय उल्लेखनीय आर्थिक विकासाच्या घडामोडी होत आहेत. अर्थव्यवस्थेला आणखी चालना देण्यासाठी डिझेल आणि पेट्रोलच्या उत्पादनशुल्कात मोठ्या प्रमाणावर कपात करण्याचा भारत सरकारने निर्णय घेतला.
पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादनशुल्कातील कपातीमुळे त्याच्या वापराला देखील चालना मिळेल आणि महागाईचा दर कमी राहील. परिणामी गरीब आणि मध्यमवर्गाला दिलासा मिळेल. आजच्या निर्णयामुळे अर्थचक्राला आणखी गती मिळण्याची अपेक्षा आहे.
ग्राहकांना दिलासा देण्यासाठी राज्यांनी देखील पेट्रोल आणि डिझेलच्या मूल्यवर्धित करामध्ये(व्हॅटमध्ये) कपात करावी असे त्यांना आवाहन करण्यात येत आहे.