महाराष्ट्र शासन कृषि विभाग, कृषि तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) व मराठा चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर, पुणे यांचे संयुक्त विद्यमाने कृषी निर्यात प्रशिक्षणाचे आयोजन केले आहे.
“विकेल ते पिकेल” ह्या संकल्पनेतून शेतकरी उत्पादक ते कृषिनिर्यातदार विषयीचे शेतकऱ्यासाठी परिपूर्ण एक दिवसीय मोफत प्रशिक्षण दिले जाईल.
दि १६ फेब्रुवारी २०२२ व १० मार्च २०२२ रोजी मराठा चेंबर ऑफ कॉमर्स,इंडस्ट्रीज अँड अग्रीकल्चर,ए विंग, पाचवा मजला, एम.सी.सी.आय. टॉवर, सेनापती बापट रोड, पुणे येथे प्रशिक्षण होणार आहे.
शेतकरी वैशिष्ट्यपूर्ण व चांगल्या प्रतीच्या शेतमालाचे उत्पादन करीत आहेत, शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या शेतमालाची निर्यात केल्यास निश्चितच त्यांना अधिक दर मिळून त्यांचे निव्वळ उत्पन्नात भर पडणार आहे. त्याचबरोबर बेरोजगारी दूर होण्यास मदत होणार आहे.
सदर प्रशिक्षणामध्ये शेतकऱ्यांना निर्यात संधी, विपणन आणि ब्रँडिंग, निर्यात प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे व प्रमाणिकरण, कृषि निर्यात अर्थ व्यवस्थापन व कृषि निर्यात योजना याबाबतीत परिपूर्ण माहिती देण्यात येणार आहे.
यावेळी निर्यात क्षेत्रातील तज्ञ मार्गदर्शक तसेच शेतीमाल निर्यात करणारे शेतकरी मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहणार आहेत. प्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याचे वय हे १८ ते ४० वर्षे असावे व शिक्षण किमान १० वी पास असावे.