चवळी पिकाबाबत देशातील व राज्‍यातील पिक पैदासकार करणार विचार मंथन

वनामकृविच्‍या बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्रात चवळी शेतीदिनाचे आयोजन

भारतीय स्‍वातंत्र्याचा अमृत महोत्‍सवी वर्ष आणि वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाचे सुवर्ण महोत्‍सवी वर्षानिमित्‍त विद्यापीठ व नवी दिल्‍ली येथील भारतीय कृषि अनुसंधान परिषदेच्‍या राष्‍ट्रीय वनस्‍पती अनुवंशीक संसाधन संस्‍था यांचे संयुक्‍त विद्यमाने बदनापुर (जि जालना) येथील कृषि संशोधन केंद्र येथे दिनांक 13 ऑक्‍टोबर रोजी सकाळी 10.00 वाजता चवळी जर्मप्लाझम शेतीदिनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्‍हणुन कुलगुरू मा डॉ अशोक ढवण हे उपस्थित राहणार असुन संशोधन संचालक डॉ दत्‍तप्रसाद वासकर, राष्‍ट्रीय वनस्‍पती अनुवंशीक संसाधन संस्‍थेचे संचालक डॉ अशोककुमार, कानपुर येथील दाळवर्गीय संशोधन संस्‍थेचे व्‍यवस्‍थापकीय संचालक डॉ कुल‍दिप त्रिपाठी आदींची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.

सदरिल शेतीदिनास राष्‍ट्रीय वनस्‍पती अनुवंशीक संसाधन संस्‍थेचे शास्‍त्रज्ञ तसेच महाराष्‍ट्रातील कडधान्‍य पिकात संशोधन करणारे व विद्यापीठ शास्‍त्रज्ञ आदींचा सहभाग राहणार असुन यावेळी कडधान्‍य बियाणे पैदासकार चवळीच्‍या जर्मप्‍लाझमध्‍ये परिवर्तनशीलतेची पातळी निश्चित करणे व त्‍यांच्‍या संबंधीत प्रजनन कार्यक्रम यावर विचार मंथन करणार आहेत, यामुळे चवळी पिकांच्‍या संशोधनाची दिशा ठरविण्‍यास मदत होणार आहे. बदनापुर येथील कृषि संशोधन केंद्राच्‍या प्रक्षेत्रावरील तुर, मुग या पिकांच्‍या जंगली प्रजातीचे वाईल्‍ड गार्डन व चवळी पिकाच्‍या विविध प्रजातीचा समावेश असलेल्‍या प्रक्षेत्रास शास्‍त्रज्ञांची भेट आयोजित करण्‍यात आली आहे.