Site icon Krishi Pandhari | कृषी पंढरी

सेंद्रीय पध्दतीने फळबाग व्यवस्थापनात एकात्मिक पध्दतीचा अवलंब आवश्यक

वनामकृवित आयोजित ऑनलाईन सेंद्रीय शेती प्रशिक्षणात प्रतिपादन

वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील सेंद्रीय शेती संशोधन आणि प्रशिक्षण केंद्राच्‍या वतीने तीस दिवसीय राज्यस्तरीय सेंद्रीय शेती प्रशिक्षणाचे ऑनलाईन माध्यमातुन दिनांक १५ फेब्रुवारी ते ३१ मार्च दरम्यान आयोजन करण्यात आले असुन सदरिल प्रशिक्षणात दिनांक ४ मार्च रोजी सेंद्रीय शेतीमधील फळबाग व्यवस्थापनावर अकोला येथील डॉ पंजाबराव देशमुख कृषि विद्यापीठातील फळशास्‍त्र विभागाचे सहयोगी प्राध्‍यापक डॉ. उज्ज्वल राऊत यांच्या व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी बदनापूर येथील मोसंबी संशोधन केंद्राचे प्रभारी अधिकारी डॉ. संजय पाटील होते तर मौजे कांबळे तर्फे महाड (जि. रायगड) येथील प्रगतशील शेतकरी श्री. तुकाराम देशमुख, आयोजक प्रमुख अन्‍वेषक डॉ. आनंद गोरे, विभाग प्रमुख डॉ. स्मिता खोडके, डॉ. मिनाक्षी पाटील, डॉ. पपीता गौरखेडे आदींची प्रमुख उपस्थिती होती. सदरिल प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन कुलगुरु मा. डॉ. अशोक ढवण व संचालक संशोधन डॉ. दत्तप्रसाद वासकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले आहे.

अध्यक्षीय भाषणात डॉ. संजय पाटील म्हणाले की, जंकफुड पेक्षा भारतीय पध्दतीने तयार झालेले अन्न मानवी शरीरासाठी योग्य आहे. ज्यामुळे ­हदय विकार, मधुमेह, स्थुलपणा, रक्तदाब इ. आजारांचा प्रादुर्भाव होत नाही. सेंद्रीय फळांचा आहारात वापर केल्यास आपले आरोग्य चांगले राहिल. आरोग्याच्या बाबतीत जागरुकता वाढत असुन सेंद्रीय अन्नपदार्थाची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. सेंद्रीय पध्दतीने फळ शेती केल्यास फळांची गुणवत्ता तर वाढतेच परीणामी फळ झाडांची किड व रोग प्रतिकारक्षमता वाढ झाल्याचे दिसुन आले आहे. फळपिकांमध्ये सुक्ष्म सिंचनाचा वापर करुन, जैविक खते विद्राव्य स्वरुपात देण्यात यावेत. ज्यामुळे खत व पाण्याची बचत होऊन तणांचा प्रादुर्भाव कमी होतो. परिणामी किड व रोगांचा प्रसार होत नाही.

प्रमुख वक्ते डॉ. उज्ज्वल राऊत मार्गदर्शनात म्‍हणाले की, फलोत्पादनात भारताचा जगात दुसरा क्रमांक लागतो. दैनंदिन आहारात फळाचे अनन्य साधारण महत्व आहे. बाजारात उपलब्ध होणारी फळे रसायनांचा वापर करुन वाढवली व पिकवली जातात जे की आरोग्यासाठी अपायकारक आहेत. त्यासाठी सेंद्रीय पध्दतीने फळलागवड केल्यास विषमुक्त फळे स्थानिक बाजारपेठ व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उपलब्ध करता येतील. आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सेंद्रीय फळांना खुप मोठी मागणी आहे. सेंद्रीय फळ शेतीत गांडुळखत, कंपोस्ट खत व इतर जैविक खते वापरल्यास चांगली फळधारणा होते तसेच फळपिकांमध्ये किड व रोगांसाठी प्रतिकारक्षमता वाढते. आंबा, पेरु, पपई, बोरं, खजुर, केळी संत्री मोसंबी आदी पिकांचे सेंद्रीय पध्दतीने उत्पादनास देशात वाव आहे. सेंद्रीय फळ शेतीसाठी लागणारे मुख्य व सुक्ष्म अन्नद्रव्य सेंद्रीय खतांमधुन देणे गरजेचे आहे, त्यामुळे फळांची गुणवत्ता वाढते व रास्त भाव मिळतो.

श्री. तुकाराम देशमुख आपल्‍या मनोगतात यांनी सेंद्रीय शेतीत हिरवळीच्या खतांचा वापर करण्‍याचा सल्‍ला देऊन धेंचा या हिरवळीच्या पिकाची लागवड व वापर बाबत माहिती सांगीतली. प्रशिक्षण कार्यक्रमास शेतकरी बंधू भगिनी तसेच विद्यार्थी, कृषि शास्त्रज्ञ, कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आदीं मोठया संख्‍येने सहभागी झाले होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन श्री. ऋषिकेश औंढेकर यांनी केले तर आभार डॉ. सुनिल जावळे यांनी मानले. डॉ. राहूल बघेले यांनी संकलक म्हणुन काम पाहिले तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ.अनुराधा लाड, डॉ. संतोष बोरगावकर, अभिजीत कदम, सतिश कटारे, योगेश थोरवट आदींनी परिश्रम घेतले.

Exit mobile version