उद्योगमंत्री मा ना श्री सुभाष देसाई; वनामकृवित आयोजित “डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” यावरील ऑनलाईन वेबिनारचे उदघाटन
भारत हा कृषि प्रधान देश असला तरी देशाच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नात शेतीचा केवळ १७ टक्के वाटा आहे, आज मोठया प्रमाणात शेतमाल उत्पादन होते, परंतु साधारणत: ३० ते ४० टक्के नासाडी होऊन वाया जातो. याकरिता शेतमालावर प्रक्रिया व मुल्यवर्धन करणे गरजेचे आहे. त्यामुळे शेतमालाची नासाडी न होता, शेतक-यांनाही आर्थिक लाभ होईल. शेतमाल प्रक्रिया केल्यासच शेतीला भविष्य आहे, असे प्रतिपादन राज्याचे उद्योगमंत्री मा ना श्री सुभाष देसाई यांनी केले.
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठातील भारतीय अनुसंधान परिषद नवी दिल्ली आणि जागतिक बँक पुरस्कृत राष्ट्रीय कृषि उच्च शिक्षण प्रकल्प (नाहेप), नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्नप्रक्रिया उद्योजक संघटना आणि मुंबई येथील फार्म टु फोर्क सोल्युशन यांच्या संयुक्त विद्यमाने “डिजीटल तंत्रज्ञानाद्वारे कृषि प्रक्रिया उद्योग : उद्योजकांच्या यशोगाथा” या विषयावर एक आठवड्याचे ऑनलाईन वेबिनारचे आयोजन दिनांक २७ जुलै ते ३१ जुलै दरम्यान करण्यात आले असुन या वेबिनाराच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
उद्योगमंत्री मा. ना. श्री सुभाषजी देसाई पुढे म्हणाले की, कृषि प्रक्रिया उद्योगाच्या विकासासाठी शासनाने अनेक धोरणात्मक निर्णय घेतलेले असुन शासकीय योजनाचा कृषिच्या विद्यार्थ्यींनी कृषि प्रक्रिया उद्योग उभारून लाभ घ्यावा. यात कृषि विद्यापीठांची महत्वाची भुमिका राहणार असून विद्यापीठातून शिक्षण घेऊन बाहेर पडणारे स्नातक विद्यार्थी यांना शेतमाल प्रक्रिया उद्योजक होण्यासाठी प्रेरित करावे.
देशात होणारा शेतीमालाची नासाडी कमी करण्यासाठी अद्यावत पुरवठा साखळी तथा मुल्यवर्धनासाठी संशोधन करावे. जिल्हातंर्गत असलेल्या औद्योगिक वसाहातीत शेतमाल प्रक्रिया व मुल्यवर्धन उद्योगासाठी भुखंड राखीव ठेऊन सदरील उद्योगांना प्राधान्य देण्यात येत असुन उद्योग विकासाकरिता उद्योगमित्र पुरविण्याचे आश्वासनही त्यांनी दिले.
सदरिल वेबिणारचे थेट प्रक्षेपण विद्यापीठाचे युटयुब चॅनेल www.youtube.com/user/vnmkv यावर होणार आहे.
वेबीनार च्या समारोपीय समारंभ अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त मा डॉ अरूण उन्हाळे यांच्या प्रमुख उपस्थिती पार पडणार असुन विशेष अतिथी म्हणुन नवी दिल्ली येथील अखिल भारतीय अन्न प्रक्रिया उद्योजक संघटनाचे अध्यक्ष मा डॉ सुबोध जिंदाल व भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालयातील जैव तंत्रज्ञान विभागाच्या संचालिका डॉ संगिता कस्तुरे उपस्थित राहणार आहेत.
पाच दिवस चालणा-या वेबीनर मध्ये देशातील कृषि प्रक्रिया क्षेत्रातील अग्रगण्य अशा उद्योगांचे प्रमुख तथा संचालक मार्गदर्शन करणार आहेत, या उद्योजकांच्या यशोगाथा प्रत्यक्षपणे त्यांच्या तोंडुन ऐकता येणार असुन त्यात विविध कृषि प्रक्रिया उद्योगांबाबत सखोल चर्चा करणार आहेत.